मुंबई : राज्यात गंभीर होत चाललेल्या पाणीप्रश्नाची राज्य सरकारनं अखेर दखल घेतलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाणीप्रश्नाबाबत लक्ष घालण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले आहेत.
पाणीप्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी 20 जिल्हाधिका-यांशी व्हिडीओ कॉ़न्फरंसिंगद्वारे संवाद साधला. धरणातील पाणी अग्रक्रमाने पिण्यासाठी वापरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत. तसंच गरज असेल त्याठिकाणी टँकरने तातडीने पाणीपुरवठा करावा अशा सूचना मुख्यमंत्र्य़ांनी दिल्या आहेत.
पावसाने संपूर्ण राज्यात दडी मारलीय. कोकणात जूनच्या सुरूवातीला थोडासा पाऊस झाला. त्यामुळे शेतक-यांनी भातशेतीच्या पेरण्या केल्या ख-या पण आता पावसाची चिन्ह नाहीत. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट उभं राहीलंय. त्यातच धरणाच केवळ 32.47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा 2 महिने पुरेल इतकाच आहे. त्यामुळे कोकणात पाणीसंकट उभं राहीलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.