www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सुप्रीम कोर्टाने डान्सबार बंदीचा निर्णय रद्दबादल ठरवल्यामुळे पुन्हा एकदा डान्सबारवर चर्चा सुरु झाली. काही वर्षांपूर्वी डान्सबारमुळे राज्यात एक नवी संस्कृतीच उदयास आली होती. अवघ्या काही वर्षात राज्यात डान्सबारचं पेव फुटलं होतं. रंगीबेरंगी दिव्यांच्या अंधूक प्रकाशातली ती दुनियाच काही वेगळी होती. पण त्या दुनियेचा काळा चेहरा समोर आल्यावर सरकारला बंदीचा बडगा उगारावा लागला.
राजेरजवाड्यांच्या काळात मनोरंजनासाठी खास नर्तकी सेवेत असे... नर्तकीच्या नृत्याचा आनंद घेतांना मद्याचे चषक रिते होतं असतं...
पण पुढे काळ बदलला आणि त्याबरोबर सगळं काही बदललं...अलीकडच्या काळात मायानगरी मुंबईत डान्सबार संस्कृती उदयास आली होती. आणि पहाता पहाता डान्स बार ही जणू मुंबापुरीची ओळख बनली होती.
रंगीबेरंगी दिव्यांचा मंद प्रकाश...संगीताच्या तालावर नृत्य करणा-या बारबाला..त्यांची ह्रदय घायाळ करणारी दिलखेच अदा...बारबालांवर होणारा नोटांचा पाऊस... जणू कलीयुगातील इंद्राचा दरबारचं भासावा असं इथलं वातावरण...त्यामुळेच अवघ्या काही वर्षात मुंबई आणि उपनगरांमध्ये डान्सबारचं पेव फुटलं होतं...
मुंबईच्या डान्सबारची खाती देशभर पसरली. तरुणाईला तर डान्सबारने वेड लावलं होतं. रात्र झाली की डान्सबार शौकिनांनी भरुन जात असत. रात्री मंद दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघणारी ती एक वेगळीच दुनिया होती. एका रात्रीत बार बालांवर लाखो रुपयांची उधळ होत असे. त्यामुळे बारमालक गब्बर झाले होते आणि बारबालांची चांदी होत होती. त्यामुळे मुंबईप्रमाणेत राज्यातल्या इतर ठिकाणीही डान्सबार सुरु झाले...
डान्सबारचा धंदा तेजीत असल्यामुळे बिहार ,उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यातून डान्सबारसाठी सुंदर मुली आणल्या जाऊ लागल्या. गरीबीत पिचलेल्या मुलींना पैशाचं आमिष दाखवून दलाल डान्सबारसाठी नवनव्या मुली मुंबईत घेऊन येत असतं...मद्य आणि मदनिका म्हणजेच सर्वकाही असा माणणारा एक मोठा वर्ग तयार झाला...पण अत्यंत वेगाने फोफावलेल्या या डान्सबार संस्कृतीचे दुष्परीणाम हळूहळू दिसू लागले... डान्सबारमुळे अनेकजण कंगाल झाले... अनेक कुटुंब उध्वस्त झाली... बायकामुलं उघड्यावर आलीत..
बारबालांवर उधळण्यासाठी लागणा-या पैशाची तजवीज करण्यासाठी काहींनी गुन्हेगारीचा मार्ग पत्करला...रात्रभर चालणा-या डान्सबारमुळे गुन्हेगारांना नवं आश्रयस्थान मिळालं...त्यामुळे गुन्हेगारी वाढली...
पण हळूहळू समाजातून डान्सबारला विरोध वाढत गेला..विशेषतः महिलांनी डान्सबारविरोधात आघाडीच उघडली...कारण मुलाबाळांच्या तोंडचा घास डान्सबारने हिसकावून घेतला होता...त्यामुळे सरकारही जागं झाली आणि २००५ मध्ये राज्य सरकारला डान्सबार बंदीचा निर्णय घ्यावा लागला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.