दहिसरमध्ये 'सैराट'च्या 'त्या' प्रसंगाची पुनरावृत्ती...

खोट्या प्रतिष्ठेपायी मेव्हण्याची हत्या करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केलीय. धक्कादायक म्हणजे, ही घटना मुंबईसारख्या मेट्रो शहरातल्या दहीसर भागात घडलीय.  

Updated: Mar 27, 2017, 03:16 PM IST
दहिसरमध्ये 'सैराट'च्या 'त्या' प्रसंगाची पुनरावृत्ती...  title=
प्रतिकात्मक फोटो

मुंबई : खोट्या प्रतिष्ठेपायी मेव्हण्याची हत्या करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केलीय. धक्कादायक म्हणजे, ही घटना मुंबईसारख्या मेट्रो शहरातल्या दहीसर भागात घडलीय.  

घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन बहिणीनं लग्न केल्याचा राग मनात धरून भावानंच आपल्या मेव्हण्याची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलंय. नागजी पाचा भारवाड (24 वर्ष), करनाम माका चौहान (26 वर्ष), करनान लाला भारवाड (26 वर्ष) आणि राजेश कारमान गोहिल (28 वर्ष) अशी आरोपींची नावे आहेत. या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हल्ल्यात ब्रिजेश शर्मा यांचा मृत्यू झाला आहे.
    
'सैराट' या सिनेमातील शेवटच्या प्रसंगानं सगळ्यांच्याच अंगावर काटा उभा केला होता. या चित्रपटात खोट्या प्रतिष्ठेपायी केली जाणारी नायक आणि नायिकेची हत्या अनेकांना चुकचुकायला भाग पाडत होती... हीच घटना प्रत्यक्षात घडल्यानं अनेकांना या सिनेमाची पुन्हा एकदा आठवण झालीय. मुंबईसारख्या शहरात अशी घटना घडणं हे माणुसकीला आणि समाजाला काळिमा फासणारं आहेच पण, तितकंच धक्कादायकही आहे.