www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इंडियन मुजाहिद्दीनचा फरार दहशतवादी अफजल उस्मानी अखेर एटीएसच्या जाळ्यात सापडलाय. २० सप्टेंबरला उस्मानी मुंबईच्या मोक्का कोर्टातून पळून गेला होता. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य, भटकळ बंधूंचा खास साथीदार अफझल उस्मानीला आज पुन्हा जेरबंद करण्यात आलंय.
नेपाळ सीमा पार करून पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत असतानाच मुंबई एटीएसनं त्याला बेड्या ठोकल्या. २००८मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये आणि मुंबईतल्या बॉम्बस्फोटांमध्ये उस्मानीचा सक्रिय सहभाग होता.
२५ ऑक्टोबरला काळाचौकी एटीएस युनिटला उस्मानीबद्दल माहिती मिळाली होती. उस्मानीचा एक नातेवाईक असलेल्या जावेदला पोलिसांनी अटक केली होती. त्यानं चौकशी दरम्यान उस्मानीचा पत्ता सांगितला. जावेदनं सांगितलं की, उस्मानी उत्तर प्रदेशमध्ये भराईच जिल्ह्यातील ततेरा गावात रजीया खान या आपल्या भाचीकडे लपला आहे.
मुंबई एटीएसनं तात्काळ यूपी पोलिसांची मदत घेतली. यूपी पोलिसांना अफजल उस्मानी बॉर्डर पार करुन नेपाळमध्ये पळून जाण्याच्या बेतात असल्याचं कळलं. तेव्हाच मुंबई पोलिसांनी त्याला नेपाळ सीमेजवळ अटक केली. नेपाळ सीमेजवळ असलेल्या उपाडिहा रेल्वे स्टेशनवर काल दुपारी त्याला अटक करण्यात आली. उस्मानीला अटक केल्यानंतर त्याला कालरात्री मुंबईत आणलं गेलं. शिवाय उस्मानीला उत्तर प्रदेशात पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या जावेद नुराल हसन खानलाही अटक करण्यात आली आहे.
उस्मानी २० सप्टेंबरला पळून गेल्यानंतर त्यानं टॅक्सी पकडून आपल्या भावाच्या मित्राला गाठलं. त्याच्याजवळून ६०० रुपये घेऊन तो धारावीमध्ये जावेदला भेटला. आपला संशय येवू नये म्हणून त्यानं आपले कपडे काढून गटारात टाकले. तर बस पकडून बोरीवलीतून गुजरातला जाणारी बस पकडली. मग सुरतला पोहोचल्यानंतर उस्मानी भोपाळ, जबलपूर मार्गे उत्तर प्रदेशच्या ततेरा इथं पोहोचला.
बनावट आयडी बनवून अफजल उस्मानी नेपाळमध्ये पळून जाणार होता. जावेद उस्मानीचे काही कागदपत्र घ्यायला मुंबईत आला असता एटीएसनं त्याला पकडलं आणि मग मिशन उस्मानी पूर्ण झालं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.