www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देशातल्या पहिल्या ‘भारतीय महिला बँक’ या सरकारी बँकेचं पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते काल उदघाटन करण्यात आलं. दिल्लीतील विधानसभा निवडणुकींमुळे आचारसंहिता लागू असल्याने बँकेचं उदघाटन मुंबईत केलं गेलं.
महिलांसाठी चालवण्यात येणाऱ्या या बँकेच्या देशात सात शाखा सुरूवातीला कार्यान्वित होणार आहेत. मुंबई बरोबर दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, गुवाहाटी इथं या शाखा सुरू होतील. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी या महिला बँकेची घोषणा केली होती.
स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या ९६ व्या जयंतीच्या निमित्ताने झालेल्या या सोहळ्यात यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत या बँकेच्या पहिल्या सात शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वित्तमंत्र्यांनी महिला बँक स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर अल्पकालावधीत ही बँक स्थापन झाल्याबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आनंद व्यक्त व्यक्त केला. यावेळी महिला सक्षमीकरणासाठी बँक सुरू करणे हे एक छोटेसे पाऊल आहे; पण महिलांचे सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी भरपूर काही करण्याची गरज असल्याकडे लक्ष वेधतानाच पंतप्रधान म्हणाले.
ग्रामीण आणि शहरी प्रशासनामध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा कायदेशीररीत्या राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंधरा राज्यांनी गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ५० टक्के जागा राखीव ठेवून ही कार्यपद्धती विकसित केली असल्याकडे लक्ष वेधले.
देशातील केवळ २६ टक्के महिलांचे बँक खाते असून दरडोई कर्जाचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी म्हणजे फक्त आठ टक्के आहे. बचत गट, अगदी अल्प मध्यमवर्गीयांपासून ते अतिर्शीमंत महिलांच्या गरजा या बँकेमार्फत भागवण्यात येतील. प्रारंभी देशभरात या बँकेच्या शाखा सुरू करण्यात येणार असून त्यानंतर या बँकेचा आणखी विस्तार करण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली.
एक लाख रुपयांपर्यंतच्या बचत खात्यांवर ४.५ टक्के, तर एक लाखापेक्षा जास्त बचतीवर ५ टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. या बँकेमुळे महिलांसाठी रोजगाराच्या मोठय़ा संधी निर्माण होणार असून ग्रामीण भागातील महिलांकडे अधिकाधिक लक्ष देण्यात येणार आहे, असे भारतीय महिला बँकेच्या अध्यक्ष अनंत सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले.
बँकेची वैशिष्ट्ये
-प्राथमिक स्तरावर मुंबई, गोहाटी, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद आदी शाखा सुरू.
-मार्चपर्यंत २५ शाखांपर्यंत विस्तार.
- बचत खात्यावर सर्वाधिक व्याज देणार.
- वित्तीय उत्पादनांमध्ये सवलत.
- आणखी दोन शाखा पाच डिसेंबरपर्यंत सुरू होणार.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.