www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत मोनो रेल धाऊ लागली. आता मेट्रो रेल्वेची स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची आशा निर्माण झाली आहे. मुंबईकरांना मेट्रोची माहिती व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो-१ रेल्वेची अद्ययावत माहिती आता संबंधित परिसरातील बेस्टच्या बस थांब्यावर मिळणार आहे.
या माहितीबरोबरच मेट्रो स्थानक असलेल्या ठिकाणी कोणती बस जाणार आहे, याचीही माहिती देण्याचा प्रयत्न होणार आहे. बसची माहिती मिळण्यासाठी मेट्रो स्टेशन परिसर वाहतूक नियंत्रण योजना (सॅटीस मेट्रो) प्रणाली राबविण्यात येणार आहे. मेट्रो आणि बसच्या ११ थांब्यांवरील इलेक्ट्रॉनिक्स फलकावर ही माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे प्रवास करणे सहज शक्य होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मुंबई महापालिका, बेस्ट, आरटीओ व वाहतूक पोलीस शाखेच्या सहकार्यातून ही सेवा कार्यान्वित करणार आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या ११ कि.मी. मार्गावरील मेट्रो-१चे काम पूर्ण झाले असून रेल्वे आयुक्तालयाच्या प्रमाणपत्राची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
मेट्रोतील प्रवाशांसाठी ११ स्टेशनच्या परिसरात बेस्टचे थांबे उभारण्यात आलेले आहेत. मेट्रोमध्ये संबंधित ठिकाणच्या बसच्या क्रमांकाची माहिती दिली जाईल. या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांना पायबंद घातला जाणार असून त्यावर पालिका आणि ट्रॅफिक पोलिसांकडून कारवाई केली जाईल.
तसेच स्टेशनच्या दुर्तफा ३३० मीटरचा परिसर `मेट्रो प्रभावित परिक्षेत्र` जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक स्टेशनच्या खालील मार्गावर वाहनांसाठी प्रत्येकी दोन मार्गिका, दुचाकी वाहनतळ असणार आहे. मेट्रो-१ प्रकल्पासाठी २,३५६ कोटी खर्च करण्यात आला असून प्रत्येकी २ कि.मी. अंतरावर स्टेशन असणार आहे. पूर्ण वातानुकूलित एकूण २१ मेट्रो रेल्वे असणार असून ही सेवा पहाटे ५ ते मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.
प्रकल्पांतर्गत दोन ओलांडणी पूल आहेत. त्यापैकी १८०मीटरचा एक पूल मेट्रो रेल्वेला अंधेरी पश्चिमेकडून पूर्वेला नेणार आहे तर दुसरा पूल पश्चिम द्रुतगती मार्ग ओलांडणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.