www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून स्थायी समितीत जोरदार खड्डाजंगी झाली. स्थायी समितीने वेळोवेळी सूचना देऊनही पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि आताचे ठाण्याचे आयुक्त असीम गुप्ता यांनी खड्डे बुजविण्यात दिरंगाई केली. असा थेट आरोप करण्यात आलाय. तर खड्डे बुजवून बिल वसूल करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. तर मनसेनेने सत्ताधाऱ्यांनाच जबाबदार धरलेय.
असीम गुप्ता यांनी खड्डे बुजविण्यासाठी कोल्ड मिक्स की हॉट मिक्स तंत्रज्ञान वापरायचे याबाबतचा गोंधळ घातला. वर्षभर चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळेच रस्त्यांवर खड्डे पडले असून त्याला असीम गुप्ताच जबाबदार आहेत, अशा शब्दांत हल्लाबोल करतानाच गुप्ता यांची मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावावी, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवळे यांनी केली आहे.
दरम्यान, पावसाळ्यात दरवर्षी एमएमआरडीएच्या रस्त्यांवर खड्डे पडतात. आणि दरवर्षी एमएमआरडीए हे खड्डे बुजवत नाही. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून होतो आणि पालिकेला मात्र मुंबईकरांच्या रोषाला हकनाक बळी पडावे लागते. या पार्श्वभूमीवर आता पालिकेनेच एमएमआरडीएच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, असे स्पष्टीकरण पालिकेकडून करण्यात आलेय.
मुंबईतील खड्डे बुजविल्यानंतर त्याचे बिलसुद्धा एमएमआरडीएकडून वसूल करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएतून पालिकेत आलेले नवे अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी स्पष्ट केले. श्रीनिवास यांच्या या कणखरतेमुळे एमएमआरडीएला चांगलाच दणका बसणार आहे. मात्र, यामुळे नवा वादाची ठिणगी पडेल, असे बोलले जात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.