www.24taas.com, मुंबई
तब्बल १५७ दिवस आणि २३ हजार सागरी मैल प्रवास करणारा लेफ्टनंट कमांडर अभिलाष आज मुंबईत दाखल होतोय. प्रशांत, अटलांटिक आणि हिंदी असे तीन महासागरांचा तब्बल २३ हजार सागरी मैलांचा प्रवास करणाऱ्या अभिलाषचे पाय आज जवळपास पाच महिन्यानंतर जमिनीला लागणार आहेत.
पृथ्वीची सागरी प्रदक्षिणा करणाऱ्या अभिलाषचे ‘गेट वे ऑफ इंडिया’वर स्वागत करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीही उपस्थित राहणार आहेत. सागर परिक्रमेत कुठेही जमिनीवर पाऊल न ठेवणारा अभिलाष हा पहिलाच भारतीय आहे. त्याने १ नोव्हेंबर २०१२ या दिवशी या मोहिमेला सुरुवात केली होती. कित्येक थरारक अनुभवांना निधड्या छातीने सामोऱ्या जाणाऱ्या ‘आयएनएसव्ही म्हादेई’ या शिडाच्या नौकेतून नऊ महिन्यांत जगप्रदक्षिणा केलेले कमांडर दिलीप दोंदे या आपल्या गुरूंचा आदर्श समोर ठेवून नौदलातील लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमीनं शिडाच्या नौकेतून फक्त पाच महिन्यांत कुठेही न थांबता जगप्रदक्षिणा पूर्ण केलीय. या मोहिमेला ‘सागर परिक्रमा-२’ असे नाव देण्यात आलं होतं.