मुंबई : विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध झाली. भाजपचे अधिकृत उमेदवार प्रसाद लाड आणि अपक्ष म्हणून अर्ज भरलेले भाजप नेते मनोज कोटक यांनी आज अखेरच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतलेत. त्यामुळे १० जागांसाठी आता १० च उमेदवार रिंगणात असल्यानं पुढल्या शुक्रवारी निवडणूक होणार नाही. ही निवडणूक बिनविरोध झाली. आता नारायण राणे यांची तोफ विधानपरिषद धडधडेल हे स्पष्ट झालेय.
या बिनविरोध निवडीने शिवसेनेचे दोन मंत्री विधान परिषदेचे सदस्य होतायत. तर भाजपनं एकीकडे मित्रपक्षांना खूश करताना बाहेरून आलेले मुंबईतील दोन नेते विधानभवनात पाठवून महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी तयार केली. तर काँग्रेसचे नारायण राणे यांचं या निमित्तानं राजकीय पुनर्वसन झालंय. निवडणूक झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता ती शक्यताही मावळली आहे.
भाजपकडून सुरजितसिंग ठाकूर, प्रविण दरेकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत, आर एन सिंग, राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, धनंजय मुंडे, काँग्रेसकडून नारायण राणे, शिवसेनेकडून सुभाष देसाई, दिवाकर रावते हे उमेदवार विजयी झालेत. केवळ विजयाची अनौपचारीक घोषणा बाकी आहे.