www.24taas.com,मुंबई
हिंदीतील प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन यांचे ‘मधुशाला’ हे पुस्तक १९३५मध्ये प्रकाशित झाले. तेव्हापासून हरिवंश राय बच्चन प्रकाश झोतात आले आणि त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. बच्चन यांचे हे पुस्तक मराठी वाचकांच्या भेटीला येत आहे. ही संधी उपलब्ध करून दिली आहे, लेखक वसंत बागुल यांनी.
‘धर्मग्रंथ सर्व जाळून चुकली, ज्याच्या अंतर्मनाची ज्वाला
मंदिर, मस्जिद, गिरीजाघर , सर्वांना तोडणारा तो मतवाला
पंडित, मौलवी, पादर्याचा, फंदा ज्याने कापला
करू शकते आज त्याचेही, स्वागत माझी मधुशाला’
असा हरिवंशराय बच्चन यांच्या प्रख्यात कवितेचा मराठी अनुवाद आता काव्यप्रेमींच्या भेटीला येत आहे. ‘मधुशाला’ आता ‘मदिरालय’ नावाने मराठीत आणले गेले आहे. या मराठी पुस्तकाचे प्रकाशन ‘अस्मिता ट्रस्ट’ने केले आहे.
जीवनाचा आनंद उपभोगतानाच मानवी मूल्यांची कास न सोडणारी बच्चन यांची कविता आहे. ‘पद्मभूषण’ हरिवंशराय बच्चन यांची नुकतीच जन्मशताब्दी झाली. ‘मधुशाला’मुळे त्यांना सर्वोच्च लोकप्रियता लाभली. ‘मधुशाला’ ही मद्यपानाचा पुरस्कार करतेय, अशी तक्रार महात्मा गांधींकडेही केली गेली होती. त्यांनीही ‘मधुशाला’ वाचली आणि त्यात कुठे मद्याचा प्रचार तुम्हाला दिसतोय, असा सवाल केला होता.
‘वैर बढाते मंदिर मस्जिद, मेल कराती मधुशाला’ असा ‘मधुशाले’त सामाजिक संदर्भही आहे. ‘मधुशाला’चा अनुवाद अनेक भारतीय भाषांमध्ये झाला आहे. आता हे पुस्तक मराठी वाचकांसाठी पर्वणी ठरणार आहे.