`कस्टम ड्युटी` भरून बापूंच्या आठवणी भारतात!

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू मायदेशी आणण्यासाठी लाखो रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागलीय. अहिंसेचे पुजारी असलेल्या बापूंचं रक्त लागलेली माती, चष्मा, चरखा आणि इतर काही वस्तू काल भारतात आणण्यात आल्या.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 9, 2013, 08:05 AM IST

www.24taas.com, मुंबई
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू मायदेशी आणण्यासाठी लाखो रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागलीय. अहिंसेचे पुजारी असलेल्या बापूंचं रक्त लागलेली माती, चष्मा, चरखा आणि इतर काही वस्तू काल भारतात आणण्यात आल्या.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्तानं माखलेली माती डोक्याला लावणारे अण्णा हजारे... मंगळवारी हे दृश्यं दिसलं मुंबई विमानतळावर... महात्मा गांधींनी वापरलेल्या काही वस्तू मंगळवारी लंडनवरुन भारतात आणण्यात आल्यात. देशभरात खादी आंदोलनाचं माध्यम बनलेला चरखा भारतात परत आलाय. बापूंचा चष्माही मायदेशी आणण्यात आलाय. बापूंशी निगडीत अनेक वस्तू लिलावात कोट्यवधी रुपये खर्च करुन भारतात आणण्यात आल्यात. मात्र माजी केंद्रीय मंत्री कमल मोरारका यांना ही राष्ट्रीय संपत्ती मायदेशी आणण्यासाठी २२ लाख रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागली.

महात्मा गांधींच्या आठवणींचा हा ठेवा आहे. त्याची जबाबदारी आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे सोपवण्यात आलीय. देशभरात पुन्हा एकदा म. गांधींच्या विचारांची क्रांती आणण्याचं आवाहन अण्णांनी केलंय. महात्मा गांधींशी निगडीत असलेल्या या वस्तू घेऊन अण्णा ३० जानेवारीपासून परिवर्तन अभियानावर निघणार आहेत.
महात्मा गांधींची अनेक पत्रेही लंडनवरुन भारतात आणण्यात आली आहेत. अण्णांच्या माध्यमातून देशभरातील लोक या वस्तू पाहू शकतील.