www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
लग्नात पाहुणा म्हणून जाऊन चोरी करणाऱ्या एका लहान मात्र अट्टल चोराला ओशिवरा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक केलीय. अशाप्रकारे लग्नात चोरी करणाऱ्या मुलांची एक मोठी टोळी सक्रीय असल्याचं मुंबई पोलीसांच्या तपासात उघड झालय.
सुरु झालाय लग्नसराईचा महिना. तुमच्या महागड्या वस्तूंवर आहे कुणाची तरी नजर. झी मीडीया करतंय तुम्हाला सावधान! कारण लग्नात पाहुणा म्हणून येणारा एखादा व्यक्ती तुमच्या वस्तूंवर डल्ला मारु शकतो, अशी एक चोरांची आणि लहान मुलांची टोळी सक्रीय असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. विश्वास बसत नसेल तर वाचा.
लहान मुलानं कशी चोरी केली. लग्नात पाहुणा म्हणून जायचं आणि महागड्या वस्तूंवर हातसाफ करायचा हा त्याचा पेशा. याआधी डझनभर चोऱ्या त्यानं केल्यात. मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी याच सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीनं किशोरला पकडलंय.
लग्नात सगळे फोटो काढण्यात बीझी असले की हा मुलगा चोऱ्या करतो, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप रुपवते यांनी सांगितलं. चोर असल्याचं लक्षात येऊ नये म्हणून महागडे कपडे घालून हा मुलगा लग्नात पाहुणा म्हणून जायचा. हॉलमध्ये कुठे काय आहे याबाबत पाहणी करायचा आणि मग महागड्या वस्तूंवर हातसाफ करायचा.
आपण पकडलो जाऊ नये म्हणून या मुलांना विशेष ट्रेनिंगही दिली गेलीये हे पोलीस तपासात समोर आलय. एवढंचं नाहीतर लग्नात कसं वावरायचं आणि महागड्या वस्तूंची माहिती कशी मिळवायची याचबरोबर चोरलेला ऐवज घेऊन कसं निसटायचं याचीही ट्रेनिंग यांना दिल गेलय . अशा चोरांपासून सावध राहण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय.
लग्नात कोण कोण येतं आणि कोण कोण जातं यावर लक्ष ठेवण्यासाठी जवळच्या लोकांना नेमावं, महागड्या वस्तूंवर नजर ठेवण्यासाठी घरातल्या व्यक्तींना सांगा, गिफ्ट आणि अहेर घेणाऱ्या व्यक्तीकडे सेफ्टी लॉक असलेली बॅग द्यावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी लग्न आहे, त्याठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत लग्न म्हणजे घरातलं मंगल कार्य. पण, लग्नाच्या धामधूमीत योग्य काळजी घेतली नाही तर या मंगल प्रसंगालाही गालबोट लागतं. त्यामुळं घरात लग्नकार्य असेल तर एवढी काळजी नक्की घ्या.