मुंबई : म्हाडाच्या घरांसाठी लाखो लोकांनी अर्ज केले आहेत, सर्वांना आता लॉटरीच्या सोडतीची प्रतीक्षा आहे. मुंबईकरांच्या स्वप्नातलं घर अर्थात म्हाडाच्या लॉटरीसाठी लाखो जणांनी अर्ज केले आहेत.
आलेल्या लाखो अर्जांची सध्या छाननी सुरु आहे. पात्र अर्जांची पहिली यादी ५ ऑगस्ट २०१६ संध्याकाळी ६ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. तर पात्र अर्जांची अंतिम यादी ही ८ ऑगस्ट २०१६ दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या लॉटरीसाठी एकूण १ लाख ६९ हजार ७०२ जणांनी अर्ज केला होता. मात्र, १ लाख २५ हजार २१९ जणांनी त्यासाठी आवश्यक अनामत रक्कम भरली आहे. त्यामुळे ज्यांनी ही रक्कम भरली आहे तेच लॉटरीसाठी पात्र ठरणार आहेत.
म्हाडानं मुंबई विभागातल्या ९७२ घरांसाठी २२ जून २०१६ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या घरांसाठी १ लाख ६९ हजार ७०२ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख २५ हजार २१९ जणांनी पैसे भरले आहेत.
दरम्यान, एकीकडे रियल इस्टेट बाजार मंदावला असला तरीही, दुसरीकडे म्हाडाच्या घरांसाठी मोठी पसंती पाहायला मिळते आहे. यंदा ९७२ घरांच्या लॉटरीसाठी १ लाख २५ हजार २१९ अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत.