www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पुण्यामध्ये मतदारयादीतला गोंधळ आपण पाहिला. लाखो मतदारांची नावं गायब करण्याची करिष्मा सरकारी यंत्रणेनं दाखवला. आता झी मीडियाने एक धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. हा गौप्यस्फोट पाहून सरकारी यंत्रणेचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाहीत. पुण्यात आणि अमरावतीत हजारो मतदारांची नावं गायब करणा-या यंत्रणेनं मुंबईतील काही मतदारांवर मात्र मोठी कृपादृष्टी दाखवलीय. दोनदा नावे मतदार यादीत असल्याचे स्पष्ट झालेय.
मुंबईतल्या कुलाब्यात 226 नंबरच्या वॉर्डमध्ये असे मतदार आहेत त्यांची नावे दोनदा नोंद असल्याचे उघड झालेय. आश्चर्याची बाब म्हणजे या मतदारांची नावे महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांमध्ये आहेत. हे धक्कादायक वास्तव. इथं राहणा-या हजारो मतदारांची नावे दोन्ही ठिकाणी असल्याचे पुरावे `झी 24 तास`च्या हाती सापडलेत.
कुलाब्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील अनेक घरांना सध्या कुलुप लागलेलं दिसतंय. कारण इथले मतदार सहकुटुंब सहपरिवार सध्या कर्नाटकातील आपापल्या गावी मतदानासाठी गेलेत. काल कर्नाटकमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालीय. आता गावी गेलेले हे मतदार पुन्हा मुंबईत येवून 24 एप्रिलला दुस-यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कारण त्यांची नावे दोन्ही ठिकाणच्या मतदारयादीत आहेत.
विशेष म्हणजे दोन ठिकाणी मतदारयाद्यांमध्ये नाव असल्याचे हे पुरावे दहा-बारा दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले. मात्र निवडणूक आयोगानं त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दोनदोन ठिकाणी मतदान करण्याचं आवाहन म्हणे गंमतीनं केलं होतं. पण कुलाब्यातील मतदारांनी ती गंमत आता प्रत्यक्षात उतरवली असून, निवडणूक यंत्रणेच्या गलथान कारभाराची लक्तरेच वेशीवर टांगलीत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.