पुढच्या वर्षी बुकिंग क्लार्कची मेगा भरती

२००५ पासून मध्य रेल्वेमध्ये तिकिट बुकिंग क्लार्कची भरती न झाल्यामुळे नाइलाजाने तिकीट खिडक्या बंद ठेवावे लागत असल्याची कबुली देतानाच पुढील वर्षांपासून बुकिंग क्लार्कची मेगा भरती करणार असल्याचे संकेत महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी दिले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 9, 2012, 03:14 PM IST

तिकीट खिडक्या बंद ठेवणार नाही
मध्य रेल्वेचे संकेत
www.24taas.com,मुंबई
२००५ पासून मध्य रेल्वेमध्ये तिकिट बुकिंग क्लार्कची भरती न झाल्यामुळे नाइलाजाने तिकीट खिडक्या बंद ठेवावे लागत असल्याची कबुली देतानाच पुढील वर्षांपासून बुकिंग क्लार्कची मेगा भरती करणार असल्याचे संकेत महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी दिले.
महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. अनेक स्थानकांवर तिकीट खिडक्या बंद असल्याबाबत जैन यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, सध्या मध्य रेल्वेमध्ये ११ टक्के बुकिंग क्लार्कची कमतरता आहे.
२००५ पासून रेल्वे भरती बोर्डाकडे पाठपुरावा करूनही अद्यापपर्यंत तिकीट बुकिंग क्लार्कची भरती झालेली नाही. रिक्त पदांबाबत २००७ साली रेल्वे भरती बोर्डाला बुकिंग क्लार्क उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती, परंतु त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. त्यानंतर पुन्हा २०१० साली आठवण केली असता रेल्वे भरती बोर्डाने नव्याने रिक्त जागांची सविस्तर माहिती मागितली. या गोष्टीला दोन वर्षे उलटली. या भरतीला किमान अजून एक वर्ष तरी लागेल.
९८० एटीव्हीएम बसविणार
उपनगरीय प्रवाशांची तिकीट खिडकीवर उसळणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या स्थानकांवर वर्षभरात ९८० एटीव्हीएम मशीन्स बसविण्यात येणार असल्याचे जैन यांनी सांगितले. त्यापैकी २५० एटीव्हीएम मशीनचे टेंडर खुले करण्यात आले आहे. तर सध्या वापरात असलेल्या २०५ मशीन्समध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.
वेटिंगवरील प्रवाशांना विशेष गाडीत प्राधान्य
गणपती, उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा सणाच्या मोसमात चालवल्या जाणार्या विशेष गाडीच्या आरक्षणातील काळाबाजार थांबविण्यात येणार आहे. त्यासाठी नियमित धावणार्याआ एक्स्प्रेस गाड्यांचे वेटिंग असणार्याम प्रवाशांना विशेष गाड्यांत प्राधान्याने आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे जैन यांनी सांगितले. त्यामुळे दलालांचा हस्तक्षेप आपोआपच मोडून निघेल.