मोदींची स्तुती करायचीय, मुंबई सोडा – नितेश राणे

मुंबईत राहून नरेंद्र मोदींची स्तुती करायची असेल आणि गुजरातचं गुणगान करायचं असेल तर आधी मुंबईतून चालते व्हा, असा सज्जड दम स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी मुंबईतल्या गुजराती समाजाला दिलाय.

Updated: Aug 2, 2013, 06:49 PM IST

www.24tass.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत राहून नरेंद्र मोदींची स्तुती करायची असेल आणि गुजरातचं गुणगान करायचं असेल तर आधी मुंबईतून चालते व्हा, असा सज्जड दम स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी मुंबईतल्या गुजराती समाजाला दिलाय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी मुंबईत राहणाऱ्या गुजराती समाजाला इशाराच दिलाय.
मुंबईतल्या अनेक सोसायट्यांमध्ये गुज्जूंची दादागिरी चालते. मांसाहार करणाऱ्या कुटुंबांना ते घर मिळू देत नाहीत. शाकाहारी-मांसाहारी हा भेदभाव संतापजनक आहे आणि तो संपायलाच हवा. त्यांना हवं तसं ते मुंबईला बदलू शकत नाही, त्यांचे नियम लादू शकत नाहीत, असंही नितेश राणे त्यांनी ठणकावलं.

मुंबईत राहून गुजरातच्या विकासाचा डंका पिटणं हा कृतघ्नपणा असल्याचं म्हणत, गुजरातचा विकास खरंच झाला असता, तर हे गुज्जूभाई इथं राहिले असते का?, असा मार्मिक सवालही नितेश राणे यांनी केलाय.
राणेंच्या ‘ट्विट’वर गुजराती समाज खळवळलाय. आता या वादाचे काय परिणाम होतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.