बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक उभारणीत अडथळे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्कवरील स्मारक आता सीआरझेड आणि हेरिटेजच्या कात्रीत सापडलंय. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही, शिवसेनाप्रमुखांच्या स्मारक उभारणीत अडथळे येत असल्यानं शिवसैनिकांच्या संतापाचा स्फोट झालाय..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 24, 2013, 08:56 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्कवरील स्मारक आता सीआरझेड आणि हेरिटेजच्या कात्रीत सापडलंय. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही, शिवसेनाप्रमुखांच्या स्मारक उभारणीत अडथळे येत असल्यानं शिवसैनिकांच्या संतापाचा स्फोट झालाय... ठाकरेंच्या स्मारकात अडथळे आणल्यास रूद्रावतार धारण करण्याचा इशारा शिवसेनेने दिलाय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पहिला स्मृतीदिन येत्या 17 नोव्हेंबरवर येऊन ठेपलाय... गेल्यावर्षी शिवसेनाप्रमुखांचे निधन झाल्यानंतर शिवाजी पार्कवरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच जागेवर येत्या 17 नोव्हेंबरपूर्वी बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी शिवसेना नेत्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु गेल्या दहा महिन्यांत स्मारकाची एकही वीट रचण्यात आलेली नाही... केवळ कागदी घोडे हलवण्याचेच काम सुरू आहे.
मुंबई महापालिकेत सत्तारूढ असलेल्या शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांचे उद्यानरूपी स्मारक उभारण्याची योजना आखलीय. परंतु एकीकडे हेरिटेज समितीची परवानगी आणि दुसरीकडे सीआरझेडचे निकष अशा दुहेरी कात्रीत स्मारक अडकलेय... हेरिटेज समितीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय कोणतेही बांधकाम करता येणार नाही, असे आदेश पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी जारी केलेत... त्यातच ही जागा सीआरझेडच्या कक्षेत येते. शिवाजी पार्क परिसरात बांधकाम करण्यासाठी सीआरझेडची परवानगी आणि एफएसआय उपलब्ध असणे गरजेचे आहे. परिणामी स्मारक उभारणीत नवनव्या अडचणींची भर पडत आहे. याठिकाणी केवळ मातीचे व सिमेंटविरहित स्मृतीउद्यान उभारण्याचा प्रस्तावही पुढे आलाय... मात्र त्यासाठी देखील शिवसेना नेत्यांना सरकार दरबारी जोडे झिजवावे लागणार आहेत...
दरम्यान, शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला होत असलेल्या विलंबामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारक उभारणीमध्ये सीआरझेड, हेरिटेजचे अडथळे आणू नका... अन्यथा शिवसैनिकांना आपला रूद्रावतार दाखवावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलाय...
ही सगळी अडथळ्यांची शर्यत पाहता शिवसेनाप्रमुखांचे स्मारक येत्या 17 नोव्हेंबरपूर्वी उभे राहू शकणार नाही, अशीच चिन्हे आहेत... त्यामुळे लाखो शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतीदिनी स्मारकाऐवजी शिवाजी पार्कच्या मैदानावरच डोके टेकवावे लागणार आहे...
(Zee Media)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.