सेनेचं ओपन जीम आणि राजकीय बेटकुळ्या

व्यायामाची हौस असलेल्यांना आपल्या कमावलेल्या शरीरयष्टीचं आणि दंडावरच्या फुगीर बेटकुळ्यांचं विशेष आकर्षण असतं... व्यायामाची ही नशाच अशी आहे की कालपरवा जीममध्ये जाऊ लागलेला सुद्धा, हमखास आपल्या नसलेल्या बेटकुळ्याही चाचपून पाहतो. ओपन जीमवरच्या मुद्यावरुन असाच बेटकुळ्या फुगवून पाहण्याचा उद्योग सध्या शिवसेना आणि नितेश राणे करत आहेत.

Updated: Jul 18, 2015, 09:17 PM IST
सेनेचं ओपन जीम आणि राजकीय बेटकुळ्या title=
फाईल फोटो

मुंबई : व्यायामाची हौस असलेल्यांना आपल्या कमावलेल्या शरीरयष्टीचं आणि दंडावरच्या फुगीर बेटकुळ्यांचं विशेष आकर्षण असतं... व्यायामाची ही नशाच अशी आहे की कालपरवा जीममध्ये जाऊ लागलेला सुद्धा, हमखास आपल्या नसलेल्या बेटकुळ्याही चाचपून पाहतो. ओपन जीमवरच्या मुद्यावरुन असाच बेटकुळ्या फुगवून पाहण्याचा उद्योग सध्या शिवसेना आणि नितेश राणे करत आहेत.

मंबईतल्या मरीन ड्राईव्हवरच्या ओपन जीमवरुन शिवसेना आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यात बेटकुळ्या फुगवून दाखवत आव्हान आणि प्रतिआव्हान देण्याचा डाव सध्या रंगला आहे. अनधिकृत जीम उखडून टाकण्याचा इशाराच नितेश राणे यांनी दिल्यानंतर शिवसैनिक स्वतः रस्त्यावर उतरले आणि पोलीस जिमखान्याजवळच्या ओपन जीमचं रक्षण करण्यासाठी पुढे सरसावले.

'असेल हिंमत तर जीमला हात लावून दाखवा', 'अंगावर आलात तर शिंगावर घेऊ' असं दंड थोपटत शिवसेना स्टाईल प्रती आव्हानच शिवसेनेकडून नितेश राणेंना दिलं गेलं.

त्यावर 'अंगावर घेण्यासाठी शिंग राहिली आहेत कुठे?' असा खोचक प्रश्न विचारत पिळदार शरीराच्या नितेश राणेंनी शिवसेनेवर पलटवार केला. सोबतच शिवसेनेला थेट आव्हान देणारं ट्वीटही केलं. 'बघूया आता मुंबई महापालिका काय करते ? अन्यथा जीम तर तिथून निघणारच... टाइम आणि दिवस सांगून जीम काढायला येऊ... चिंता नको!' असं ट्वीट नितेश राणेंनी केलं.

यानंतर ओपन जीमच्या या वादात राष्ट्रवादी काँग्रेसनंही उडी घेतली. अनधिकृत जीम राहिली तर फेरीवाल्यांनाही मरीन ड्राईव्हवर आणू असा इशारा देत, आपलीही बेटकुळी राष्ट्रवादीनं मधल्यामध्ये फुगवून दाखवली.

एकंदरीत जीम मुद्यावरुन राजकीय जोर बैठका सुरु झाल्या आहेत. राजकीय भांडवलासाठी हा आपसूक विषय हाती लागला आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या बेटकुळ्या फुगवून दाखवण्याची आयती संधी तर साधणारच... मात्र बेटकुळ्यांच्या या खेळात आधीच समस्यांनी खंगलेल्या सामान्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे हे नक्की. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.