मुंबई : मायानगरी मुंबई. अनेकांना भूरळ पाडणारं हे शहर. या शहरात नशीब आजमावायला तसंच आकर्षणापोटी येणाऱ्यांत अनेक लहान मुलांचाही समावेश असतो. अशा मुलांना बालसुधारगृहात ठेवलं जातं. त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्त करण्याचा ह्रद्य सोहळा पार पडला. एक स्पेशल रिपोर्ट.
डोंगरीच्या बालसुधारगृहातला आजचा दिवस विशेष होता. त्याचं कारण होतं, आईवडिलांना त्यांचं हरवलेलं मुल परत मिळणार होती. डोळ्यात भावनांची गर्दी झाली होती आणि तो क्षण आला. मुंबईचं आकर्षण पडून मायानगरीत हरवलेल्या बालकांना त्यांचे मातापिता परत मिळाले.
नकळत्या वयात पालकांच्या सुरक्षित छताखालून पळून आलेली ही लहानगी पुन्हा आपल्या सुरक्षित घरट्यात परतली. राज्याच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यातून मुंबईच्या आकर्षणापोटी इथे मुलं येतात. किंबहुना अनेकवेळा घरची बिकट परिस्थितीच मुलांना हे पाऊल उचलण्यास बरेचदा भाग पाडते. अशा मुलामुलींना सामाजिक संस्था बालसुधारगृहात सुरक्षित आणतात. त्यांच्या पालकांशी संपर्क झाल्यावर त्यांना बालकल्याण समितीच्या आदेशानुसार पालकांकडे सोपवलं जाते.
महिन्याला जवळपास २०० हून अधिक मुलं डोंगरीच्या बालसुधारगृहात इथे दाखल होतात. दाखल झालेल्या प्रत्येकाला आपल्या पालकांकडे सुपूर्त करण्याचा प्रयत्न असतो. मात्र मुंबईत रस्ता चुकलेल्यांची संख्या एवढ्यापुरती मर्यादीत नाही. पोलीस, सामाजिक संस्था आणि इतर यंत्रणांच्या नजरेत न आलेली बालकं मायानगरीत कुठे हरवली जातात हे कोडं कधीच उलगडत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.