www.24taas.com, मुंबई
दरवाढीच्या बातम्या सतत कानी पडत असताना पेट्रोल आणि घरगुती गॅस स्वस्त झाल्याची बातमी आली की सर्वसामान्य माणसाइतका आनंद खचितचं कुणाला होतं असेल. त्यात काल एक एप्रिल असताना पेट्रोल-गॅस स्वस्त झाल्याची बातमी आली तर त्यावर विश्वास बसणं कठीणच होतं. पण, ही बातमी खरी आहे.
विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमती तीन रुपयांनी तर पेट्रोल ८५ पैशांनी स्वस्त करण्यात आले असून यामुळे मुंबईत घरगुती गॅस सिलिंडर आता ९१२ रु. तर पेट्रोल ७४ रु. १४ पैशांनी मिळेल. सोमवारी मध्यरात्रीपासूनच हे दर लागू झालेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे ग्राहकांना ही गूड न्यूज मिळाली आहे. स्थानिक कर वगळून मुंबईत घरगुती गॅस साडेसात रु.नी तर पेट्रोल १ रु. ७ पैशांनी स्वस्त झाले आहे. सोमवार, १ एप्रिलपासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षात ग्राहकांना ९ सिलिंडर अनुदानित किंमतीत मिळणार आहेत. त्यानंतरचा प्रत्येक सिलिंडर बाजारभावाने घ्यावा लागणार आहे. जानेवारीत विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये तेल कंपन्यांनी ४६.५० रुपयांनी वाढ केली होती.
दुसरीकडे पेट्रोलमध्येही दोन आठवड्यांच्या अंतराने दुसरी दरकपात झाली आहे. यापूर्वी १६ मार्चला पेट्रोल २ रु.नी स्वस्त झाले होते. डॉलरच्या किंमतीत झालेली घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमती प्रतिबॅरल स्वस्त झाल्याने पेट्रोलचे दर कमी करण्यात आले असल्याचे इंडियन ऑइलने स्पष्ट केले आहे.