www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई पोलीस दलातील एसीपी दर्जाचा अधिकारी चक्क मुंबई महापालिकेचा सफाई कर्मचारी बनून वेतन लाटत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय.
दहिसरमधील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाला केतकीपाडा इथला परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम मुंबई महापालिकेकडून मिळालं होतं. परंतु या बचत गटात सफाई कामगार म्हणून मुंबई पोलीस दलातील एसीपी विजय बागवे यांचंही नाव असल्याचं समोर आलंय.
विशेष म्हणजे दर महिन्याला महापालिका त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ५ हजार ६०० रुपये जमा करतेय. इतकंच नव्हे तर त्यांच्या पत्नी आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी वृषाली बागवे, कन्या वैशाली आणि पुत्र विजय यांचीही नावे सफाई कामगारांच्या यादीत आहेत. कुठलंही सफाईचं काम न करता दरमहा २२ हजार रुपये बागवे कुटुंबीय घरबसल्या कमवत होते.
गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरु असल्याचं सांगण्यात येतंय.
या परिसरात स्वच्छता होत नसल्याची तक्रार नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्याकडं स्थानिकांनी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आला. बागवेंच्या पत्नी वृषाली यांनी मागील महापालिका निवडणूक शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. दरम्यान, याबाबत काहीही बोलण्यास बागवे कुटुंबियांनी साफ नकार दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.