मुंबई : गणरायाचं आगमन अवघ्या एक दिवसावर य़ेऊन ठेपलंय. घरोघरात आणि प्रत्येक सार्वजनिक चौक-गल्ली-चाळी-सोसायट्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची उद्यापासून एकच धूम उडणार आहे. बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सगळीकडे सुरू आहे.
आसार-मखरांवरून अखेरचा हात फिरवणं सुरू आहे. नैवेद्याला काय-काय करायचं याची चर्चा होतेय. दुसरीकडे अखंड सौभाग्यासाठी हरतालिकेचं व्रत आज घरोघरी केलं जाईल. मनाजोगता पती मिळावा यासाठी कुमारिकाही हे व्रत करतात. सकाळी हरितालिकांची पूजा करून दिवसभर उपास केल्यानं मानतल्या इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
गणेश हा ज्ञानाचा अधिपती आणि विज्ञानाचा स्वामी आहे. त्याचा उत्सव म्हणजे एक प्रकारे विज्ञानाची जोपासना आहे अशा शब्दांत प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दा.कृ. सोमण यांनी गणरायाचं वर्णन केलंय.. गणेश हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिष्ठाता आहे. त्यामुळे गणराया आणि विज्ञान यात एक वेगळं नातं असल्याचं ते म्हणतात. तसंच आधुनिक युगातला संगणक आणि गणराय यांचीही सांगड सोमण यांनी घातलीये...
सार्वजनिक गणपती मंडळाच्या नागपूरच्या राजाचं काल वाजतगाजत आगमन झालं. गणपती उत्सव चेरीटेबल ट्रस्टतर्फे गेल्या १८ वर्षांपासून रेशीमबाग परिसरात गणेशोत्सव साजरा केला जातो. मूर्तीची स्थापना होते. १२ फुटांची ही देखणी मूर्ती चितार ओळी भागातून वाजतगाजत रेशीमबागेमध्ये आणली जाते. गणरायाच्या स्वागतासाठी नागपूरकरांचा उत्साह ओसंडून वाहतोय. नागपूरच्या राजाबरोबरच गल्लोगल्ली मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आलीये. काही ठिकाणी बाप्पांचं आधीच आगमन झालंय तर काही मंडपांमध्ये आज गणेशमूर्ती आणल्या जातील.
गोव्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तींवर बंदी आहे. त्यामुळे हस्तकला महामंडळाने गणेश भक्तांना कमी दरात मातीच्या सुबक मूर्ती उपलब्ध करून दिल्यात. तसंच मूर्तीकाराना प्रोत्साहन म्हणून पहिल्या 250 मूर्तींसाठी प्रत्येकी शंभर रुपये विशेष अनुदानही दिलं जातंय. यंदा पाचशेहून अधिक मुर्तीकारांना सुमारे ६५ लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.