दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई: आरेमध्ये कारशेड उभी करण्यास मनसेचा संपूर्णपणे विरोध होता आणि असेल, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलीय. राज्य सरकारनं आज मेट्रो ३ची कारशेड गोरेगावच्या आरे कॉलनीतच होईल, असं जाहीर केलंय. त्यानंतर राज ठाकरेंनी सरकारवर तोफ डागलीय.
मेट्रो ३ कारशेडसाठी मुंबईत दुसरी इतकी मोठी जागा नसल्याचं सरकारनं सांगितलं, त्यावर प्रतिक्रिया देत, भाजप सरकारला जागा दाखवल्या होत्या. तसंच कारशेडच्या जागेचा निर्णय एखाद दुसरा मंत्री घेऊ शकत नाही, त्याबाबत फक्त मुख्यमंत्रीच निर्णय घेऊ शकतात. असं राज ठाकरे म्हणाले.
बीपीटीची अशी मोठी जमीन आहे ती कोणकोणत्या उद्योगपतींच्या घशात घालायची आहे, याचाही निर्णय झाला असणार. काँग्रेस-एनसीपीची धोरण राबवायची असतील तर सत्तेवर आलातच कशाला? मग ते काय वाईट होते? तुमच्याकडून वेगळी आणि लोकहिताची धोरणं राबवली जातील, अशी अपेक्षा होती. मात्र तुमची पण मोगलाईच सुरू आहे, या शब्दात राज ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं.
आरेमध्ये कारशेड होणं हा मुंबईच्या संवेदनशील लोकांची हार असेल. शिवसेनेनंही कारशेडला विरोध केला होता, आता त्यांचं काय म्हणणं आहे? असा सवालही राज ठाकरेंनी केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.