रतन टाटा निवृत्त होणार, मिस्त्री पदभार स्वीकारणार

देशातला सर्वात जुना उद्योगसमूह असलेल्या टाटा ग्रुपचं नेतृत्व आज रतन टाटांकडून सायरस मिस्त्रींकडे सोपवलं जाणारेएत.

Updated: Dec 28, 2012, 03:00 PM IST

www.24taas.com, मुंबई
देशातला सर्वात जुना उद्योगसमूह असलेल्या टाटा ग्रुपचं नेतृत्व आज रतन टाटांकडून सायरस मिस्त्रींकडे सोपवलं जाणारेएत. टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा, यांचा आज पंचाहत्तरावा वाढदिवस आहे... त्यामुळे टाटा समूहाच्या जबाबदारीतून रतन टाटा आज निवृत्त होताएत. १९९१ पासून तब्बल दोन दशकं टाटा समूहाचं अध्यक्षपद रतन टाटांनी भूषवलंय. मात्र आजपासून सायरस मिस्त्री टाटा समूहाची सूत्रे हाती घेणार आहेत. रतन टाटा यांचे वारसदार म्हणून ४४ वर्षीय सायरस मिस्त्री यांची यापूर्वीच निवड झालीए.
वारसदाराच्या शोधासाठी वर्षभरापूर्वीच रतन टाटा यांनी समिती नियुक्त केली होती. या समितीच्या परीक्षेत टाटा समूहात संचालक असलेले सायरस मिस्त्री २०११ मध्ये पास झाले होते. त्यानंतर त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. टप्प्याटप्प्यानं सायरस मिस्त्री यांच्याकडे टाटा समूहातील अनेक कंपन्यांच्या जबाबदाऱ्या आल्या. मात्र आज ते अधिकृतपणे सूत्र हाती घेणार आहेत. टाटा समूहाची सूत्र हाती घेणं ही बाब जेवढी प्रतिष्ठेची आणि अभिमानाची आहे, तितकीच ती आव्हानात्मकही असणार आहे.
देशातला सर्वात जुना आणि सर्वाधिक विश्वासार्ह उद्योगसमूह कोणता, या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे... गेली तब्बल सव्वाशे वर्षं टाटा हे नाव भारतीय उद्योगविश्वात आपला दबदबा टिकवून आहे. जमशेटजी टाटा यांनी १९व्या शतकात सुरू केलेल्या या कंपनीचं नाव जागतिक स्तरावर आदरानं घेतलं जातं. कंपनीच्या कर्मचाऱ्यांपासून ते शेअरहोल्डर्सपर्यंत ते ग्राहकांपर्यंत प्रत्येकाच्या मनात कंपनीबद्दल विश्वास आणि प्रेम आहे. गेली २० वर्षं कंपनीची धुरा वाहणारे रतन टाटा आज निवृत्त होत आहेत.
या निमित्तानं टाटा समूहाची, प्रामुख्यानं रतन टाटा यांची कारकीर्द आणि रतन टाटांची जागा घेणाऱ्या सायरस मिस्त्री यांच्यापुढे अनेक आव्हानं असणार आहेत.