मुंबई : राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात सरासरी 5.86 टक्क्यांची वाढ केली आहे. नोटाबंदीमुळे आलेली आर्थिक मंदी दूर करण्यासाठी रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. ग्रामीण भागासाठी 7.13 टक्के, तर नगरपालिका क्षेत्रासाठी 5.56 टक्के, महालिकेसाठी 4.47 टक्के वाढ करण्यात आली आहे.
सर्वाधिक दरवाढ ही अहमदनगर महापालिकेसाठी असणार असून इथं 9.82 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत 3.95, ठाणे 3.18, पुणे 3.64, नाशिक 9.35 टक्के वाढ करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी व्यवहारातील दरात वाढ नाही, तिथे रेडी रेकनरचे दर कायम राहणार असल्याचंही राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.
गेल्या वर्षी राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात सरासरी 7 ते 8 टक्क्यांची वाढ केली होती. त्यामुळे यंदाची दरवाढ ही कमी असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न महागणार आहे.