www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आता मध्य रेल्वेच्या महिला प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. मध्य रेल्वेमार्गावर पहिल्यांदाच फक्त महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी सुरु करण्यात आली आहे. सीएसटी स्थानकावर प्रायोगिक तत्वावर खिडकी क्रमांक ११इथं ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.
एका आठवड्यात महिलांचा किती प्रतिसाद मिळतो याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर इतर रेल्वे स्थानकांवर महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना रोज कोणत्या दिव्यातून सामोरं जावं लागतं, याची जाणीव आज रेल्वेच्या संसदीय समितीच्या शिष्टमंडळाला करुन देण्यात आली. सध्या हे शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर आहे. रेल्वेला सर्वाधिक महसूल देणाऱ्या मुंबईकरांच्या समस्या काय आहेत, यासाठी हा दौरा आहे.
समितीचे अध्यक्ष टीआर बालू, खासदार हुसेन दलवाई यांनी या दौऱ्यात महिला प्रवाशांचा रोष चांगलाच अनुभवला. सीएसटी रेल्वे स्थानकावर पनवेल लोकलमध्ये भेट द्यायला गेलेल्या या शिष्टमंडळासमोर महिला प्रवाशांनी रेल्वे समस्यांचा पाढा वाचला आणि रेल्वेसेवेचे वाभाडे काढले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.