मुंबई : मनसेचे ज्येष्ठ नेते शिशिर शिंदे यांनी पक्षाचं काम करणं थांबवलं आहे. मुंबई महापालिका मतदानाच्या दिवशी शिंदेंनी राज ठाकरेंना भावनिक पत्र लिहून नेतपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली होती.
निवडणुकीच्या वेळी व्यूहरचनेपासून शिंदेंना लांब ठेवण्यात आलं होतं. भांडुप विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवार निश्चित करताना शिंदेंचं मत जाणून घेतलं नाही, म्हणून शिंदे दुखावले गेल्याची कुजबूज सुरु आहे.
महापालिका निवडणुकीनंतर झालेल्या मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमालाही शिंदे उपस्थित राहिले नाहीत. तसंच सध्या सुरू असलेल्या पक्षाच्या विभागवार बैठकांना शिंदेंनी दांडी मारली. शिंदे नाराज असल्याची चर्चा असली तरी ते दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत, असा दावा मनसे समर्थकांनी केला आहे.
90च्या दशकात शिंदे यांची आंदोलने जबरदस्त गाजली. शिवसेनेत असताना शिंदे यांनी पाकिस्तानी संघाला विरोध करताना मुंबईत वानखेडेची खेळपट्टी उखडून टाकण्याचं आंदोलन गाजलं. तर सणासुदीच्या काळात लोकांना तेल टंचाईचा त्रास भेडसावू लागताच शिंदे यांनी धारा तेलाचा ट्रक अडवून लोकांना टेलवाटप केलं.
शिंदे शिवसेनेत असताना एकदा नगरसेवक आणि आमदार पदावर निवडून आले. २००५ ला राज ठाकरे यांच्या शिवसेनेतील बंडापासून शिंदे त्यांच्यासोबत आहेत. मनसेची घोषणा करताना राज ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर स्थान मिळालेली एकमेव व्यक्ती म्हणजे शिशिर शिंदे.
शिंदेंनी मनसेत पहिल्यांदा २००९ ला लोकसभा निवडणूक लढवली आणि लक्षवेधी मतं घेतली. २००९ ला भांडुप विधानसभा मतदार संघात आमदार पदावर निवडून आले. २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेत शिंदे पराभूत झाले.