बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन लष्कर ए तोयबाचे होते टार्गेट : हेडली

बाळासाहेब ठाकरे हे लष्कर ए तोयबाच्या हिट लिस्टवर होते, असा गौप्यस्फोट हेडली यांने आज केलाय.

Updated: Feb 12, 2016, 02:30 PM IST
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन लष्कर ए तोयबाचे होते टार्गेट : हेडली title=

मुंबई : शिवसेना भवनात राजाराम रेगे यांची भेट घेतली, त्यांच्याशी मैत्री वाढविली आणि शिवसेना भवनात घुसलो. कारण शिवसेना भवनाची रेकी करायची होती. तसेच बाळासाहेब ठाकरे हे लष्कर ए तोयबाच्या हिट लिस्टवर होते, असा गौप्यस्फोट २६/११ हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेव्हिड कोलम हेडली यांने आज केलाय.

मुंबई २६/११ हल्ला : लष्कर ए तोयबा भविष्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या विचारात होती, त्यामुळे शिवसेना भवनची संपूर्ण माहिती काढण्यासाठी रेगेंच्या मदतीनेच शिवसेना भवनात घुसलो, असे हेडलीने आपल्या साक्षीत सांगितले.

हेडलीनं आज साक्षीदरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे केलेत. राजाराम रेगे नावाच्या व्यक्तीला शिवसेनाभवनात भेटल्याचं त्यानं साक्षीदरम्यान सांगितलं. राजाराम रेगे यांच्याशी हेडलीनं मैत्री केली. भविष्यात शिवसेना भवनावर हल्ला करण्याचा लष्कर ए तोयबाची योजना असेल, तर या बिल्डिंगची संपूर्ण माहिती असायला हवी, या उद्देशानं हेडलीनं शिवसेनाभवनाची पाहणी केली होती. 
मोक्ष जीमच्या विलास या व्यक्तीच्या माध्यमातून एका शरीरसौष्ठव स्पर्धेत राहुल भट याच्याही भेट झाल्याचं हेडलीनं सांगितलं.

 

२६/११ला मुंबई विमानतळ टार्गेटवर असल्याचा नवा खुलासा डेव्हीड हेडलीनं साक्षीमध्ये केलाय. त्याचप्रमाणे मेजर इक्बाल याला ही कल्पना पसंत पडली नसल्याचंही त्यानं म्हटलंय. घुसखोरीसाठी कफ परेड, गेट वे आणि वरळीची रेकी त्यानं केली होती. पाकिस्तनात गेल्यावर कफ परेडवर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं.

सिद्धिविनायक मंदिरावर हल्ल्याचा प्लॅन होता, पण तिथे कडक सुरक्षाव्यवस्था असल्यानं तो प्लॅन बदलल्याची माहिती हेडलीनं दिली. हेडलीनं सिद्धिविनायक मंदिराबाहेरुन धागेही विकत घेतले होते आणि ते दहशतवाद्यांना पाठवले होते. ते धागे बांधून दहशतवाद्यांनी हल्ला केला, तर लोक त्यांना भारतीय समजतील, असा प्लॅन त्यामागे होता.

 

तसंच बीएआरसी आणि नौदलाचा तळही टार्गेटवर होता, पण तिथेही सुरक्षा असल्यानं तो प्लॅन बदलण्यात आला. त्याचबरोबर भारतीय लष्करासंदर्भातली अनेक पुस्तकं हेडलीनं मुंबईतल्या नालंदा बुक स्टॉलमधून विकत घेतली होती.