मुंबई : शिवसेना-भाजपमधील रोजच्या भांडणामुळं युतीच्या संसारात खटके उडत असतानाच आता शिवसेनेमध्यचे समन्वय नसल्याचे पुढे आले आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतरे आणि दुसरे राज्यमंत्री संजय राठोड यांनी केलेल्या परस्पर दाव्यांमुळे समन्वयाचा अभाव असल्याचे दिसत आहे.
भाजपकडून शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना अधिकार मिळत नसल्याचे बाब पुढे आली. तर दुसरीकडे शिवसेनेचेच राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी संजय राठोड यांच्या दाव्याचं खंडन केलं आहे. आपली कुणीही खिल्ली उडवली नसल्याचं शिवतरे यांनी स्पष्ट केले आहे. यामुळं समन्वयाची भाषा करणाऱ्या शिवसेनेतला असमन्वय पुढं आला आहे.
दरम्यान, आपल्या अधिकारांबाबत आक्रमक झालेली शिवसेना आता बॅकफूटवर आलीय. वादावर समन्वय समितीच्या बैठकीत तोडगा काढू, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. राज्यातल्या जनतेला आमच्याकडून अपेक्षा आहेत. त्यासाठी स्थिर सरकारची आवश्यकता आहे, असं मतही देसाईंनी व्यक्त केले आहे.
तर सर्व मंत्र्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्रीच याबाबत तोडगा काढतील असं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलंय. तर संजय राठोड हे पहिल्यांदाच मंत्री झालेत, त्यांना अनुभन नाही. हळूहळू सवय होईल असा टोला संजय राठोड यांना लगावला. त्याचवेळी शिवसेनेचे मंत्रीही भाजपच्या राज्यमंत्र्यांना सर्व अधिकार देत नसल्याचा आरोपही खडसेंनी केलाय.
तत्पूर्वी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून बाजू मांडली होती. खडसेंनी पत्रक काढून राज्यमंत्र्यांना अधिकार दिल्याचा दावा केला होता. त्याला त्यांनी या पत्राद्वारे उत्तर दिले होते. आपले ७५ टक्के अधिकार काढून घेतल्याचा आरोप करताना शिवसेनेच्या सर्वच राज्यमंत्र्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा दावाही राठोड यांनी या पत्रात केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.