बनावट नावाने सीमकार्ड, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

इंटरनेटवरून तसेच अन्य सोशल साईटवरुन फोटो अपलोड करुन त्यांच्या नावावर बनावट सीमकार्ड मिळवून ते विकणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. बोगस कागदपत्रांवरून दहा हजार सीमकार्ड काढली गेलीत. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांचे पाकिस्तान, बांग्लादेश, नायजेरियन कनेक्शन असल्याचे पुढे येत आहे.

Updated: Jan 31, 2015, 08:43 AM IST
बनावट नावाने सीमकार्ड, आंतरराष्ट्रीय  रॅकेटचा पर्दाफाश title=

मुंबई : इंटरनेटवरून तसेच अन्य सोशल साईटवरुन फोटो अपलोड करुन त्यांच्या नावावर बनावट सीमकार्ड मिळवून ते विकणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. बोगस कागदपत्रांवरून दहा हजार सीमकार्ड काढली गेलीत. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांचे पाकिस्तान, बांग्लादेश, नायजेरियन कनेक्शन असल्याचे पुढे येत आहे.

फेसबुक, ट्विटर तसेच इतर सोशल साइटवरून फोटो डाऊनलोड करून त्यांचा वापर बनावट पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र बनविण्यासाठी वापर करण्यात येत होता. याप्रकरणी बोगस कागदपत्रांवरून सीमकार्ड घेऊन ती विकणार्‍या रॅकेटचा ट्रॉम्बे पोलिसांनी पर्दाफाश केला. 

शरीफ खान याच्यासह टाटा डोकोमो कंपनीचे सेल्स मॅनेजर अतिन वत्स ऊर्फ शर्मा, धर्मेंद्र बंगारी यांना पोलिसांनी अटक केली असून शरीफ हा विविध देशांतील अनेक व्यक्तींशी फेसबुकवरून संपर्कात होता. 

या रॅकेटमध्ये दहशतवाद्यांचा सहभाग आहे का, शरीफ परदेशात कोणाच्या संपर्कात होता आणि इतकी सीमकार्ड त्याने कोणाला विकली याचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष टीम बनविली आहे. या प्रकरणी ‘एटीएस’च्या अधिकार्‍यांचीही मदत घेण्यात येणार आहे.

इंटरनेटवरून एकाचा फोटो, दुसर्‍याचा पत्ता वापरून बोगस आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून सीमकार्ड घेण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि टोळी गजाआड केली. 

पोलिसांच्या पथकाने चिता कॅम्प येथे छापा टाकून सुमारे दोन हजार सीमकार्ड, बोगस आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच इतर साहित्य जप्त केले. शरीफ याच्या चौकशीत तो बोगस कागदपत्रे वापरून सीमकार्ड घेऊन ती विकत असल्याचे उघड झाले.

शरीफ हा सीमकार्ड डीलर म्हणून काम करतो. जितके सीमकार्ड विकणार तितके कमिशन. एका सीमकार्डला त्याला ८५ रुपये मिळायचे. हे कार्ड पुन्हा पोर्टेबल करून तो ५० रुपये कमिशन मिळवायचा. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.