मुंबईत सोसायटी वादातून गोळीबार, एक जखमी

 अंधेरीमध्ये शुक्रवारी रात्री पाच राऊंड फायर करण्यात आले. एका सोसायटीच्या नव्या सदस्याच्या निवडीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. त्याच भांडणातून परिसरातला गुंड अमजर मुजावर शेख यानं विठोबा सुत्रावे या रिक्षाचालकावर गोळीबार केला.  

Updated: May 21, 2016, 05:47 PM IST
मुंबईत सोसायटी वादातून गोळीबार, एक जखमी  title=

मुंबई : शहरातील अंधेरीमध्ये शुक्रवारी रात्री पाच राऊंड फायर करण्यात आले. एका सोसायटीच्या नव्या सदस्याच्या निवडीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. त्याच भांडणातून परिसरातला गुंड अमजर मुजावर शेख यानं विठोबा सुत्रावे या रिक्षाचालकावर गोळीबार केला. यातली एक गोळी सुत्रावेंच्या पाठीत लागली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र सुत्रावेंची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय.  

त्रिवेणी संगम या कोऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये नवीन कमिटी सदस्य निवडीचा वाद सुरू आहे. सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार अमजद शेख गेल्या पाच वर्षांपासून सोसायटी मनमानी पद्धतीनं चालवतंय. नव्या कमिटीला शेखचा विरोध आहे. कारण नव्या कमिटीमुळे शेखच्या सर्व काळ्या धंद्यांना चाप लागेल. सोसायटीतल्या सदस्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शेख करतोय. 

सुत्रावेंनी अमजद मुजावर शेखपासून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार याआधी पोलीस स्टेशनमध्ये केली होती. पण त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नव्हती.  आता मात्र सुत्रावेंची प्रकृती गंभीर असल्यानं पोलिसांची पुरती भंबेरी उडालीय. 
 
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सोसायटीमधल्या डॉ गजराज यादव यांच्या क्लिनिकमध्ये हप्ता वसुलीसाठी त्यांच्यावर पिस्तुल रोखुन धमकावलं होतं. जीवे मारण्याचा गुन्हा अमजदवर शुक्रवारच्या घटनेनंतर नोंदवण्यात आलाय. मात्र याआधीच कल्पना देऊनही पोलिसांनी ही घटना गांभिर्यानं न घेतल्यानं पोलिसांकडहे संशयाचं नजरेनं पाहिलं जातंय.