मुंबई : डिझेल दरवाढीचे कारण पुढे करत राज्य परिवहन विभागाने (एसटी) ऐन गणेशोत्सवात भाडेवाढ केली आहे. याआधी किरकोळ भाडेवाढ केली होती. सातत्याने एसटी भाडेवाढ करत असल्याने प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आज रात्रीपासून साध्या आणि जलद, रात्रसेवा आणि निमआराम सेवेसाठी प्रति सहा किलोमीटरसाठी ५ पैसे अशी भाडेवाढ जारी केली आहे. साध्या आणि जलद सेवेच्या पहिल्या २७ किलोमीटरच्या प्रवासासाठी वाढ करण्यात आलेली नाही.
एसटीच्या दादर-पुणे वातानुकूलित सेवेसाठी मात्र भाडेवाढ करण्यात आली नसून केवळ पुणे-नाशिक शिवनेरी प्रवास पाच रुपयांनी महागला आहे. गेल्या काही महिन्यांतील एसटीची ही सलग पाचवी भाडेवाढ आहे.
ही प्रवासी भाडेवाड सरासरी ०.८० टक्के एवढी असून शहरी सेवेच्या प्रवासभाड्यासाठी ती लागू करण्यात आलेली नाही. २२ ऑगस्टपूर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या आणि त्या दिवशी किंवा त्यानंतर प्रवास सुरू करणार्या प्रवाशांकडून प्रवासावेळी भाडेवाढीचा फरक वसूल करण्यात येणार आहे, असे एसटी प्रशासनाने म्हटले आहे.
मुंबई-कोल्हापूर, मुंबई-रत्नागिरी, मुंबई-पंढरपूर हा प्रवास ३ रुपयांनी महागला आहे. कोल्हापूर - रात्रीचा प्रवास ४ रुपये, रत्नागिरीचा ३ रुपये, मुंबई-अलिबाग १ रुपयांने तर मुंबई-पंढरपूर प्रवास ३ रुपयांनी महागलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.