मुंबई : मुंबईतल्या राणीच्या बागेत लवकरच परदेशी पाहुणे कायमच्या वस्तव्यासाठी येणार आहेत. सामान्यत: अंटार्टिकाच्या बर्फाळ प्रदेशातील ‘पेंग्विन’ हे प्राणी चार महिन्यानंतर राणीच्या बागेत दिसणार आहेत.
मुंबई महापालिका सहा पेंग्विन खरेदी करून राणीच्या बागेत आणणार आहे. या सहा पेंग्विन खरेदीसाठी तब्बल 2 कोटी 40 लाख रुपये खर्च होणार आहेत. तसंच, त्यांच्या देखभालीसाठी आणखी 19 करोड रुपयांची तरतूद करण्यात आलीय. यासंबंधीच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभागृहात मंजुरी देण्यात आलीय.
पेंग्विनना इथं आणल्यानंतर त्याच्या प्रकृतीला मानावणारं वातावरण, पाणी राणीच्या बागेत तयार केलं जाणार आहे. प्राणिसंग्रहालयात नव्याने बांधण्यात आलेल्या एस्क्प्लोरेशन सेंटरच्या तळमजल्यावर विशेष पक्षीगृह तयार करण्यात आलंय. यामध्ये पेंग्विनसाठी १०० चौ. मीटरचा पिंजरा बांधण्यात येणार असून त्यामधील निम्म्या जागेवर पाणवठा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या पक्ष्याला त्याच्या नैसर्गिक गरजा भागविण्यासाठी गुहा, बीळ व बसण्याकरीता मोठे दगड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यासाठी, दोन अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांना परदेशात पाठवून पेंग्विनना हाताळण्यासाठीचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. केंद्रीय प्राणीसंगहालय प्राधिकरणानं 20 पेंग्विन खरेदी करण्याची परवानगी दिली असली तरी सध्या केवळ सहा पेंग्विन म्हणजेच 'हम्बोल्ट पेंग्विन'च्या तीन जोड्या खरेदी केल्या जाणार आहेत.
भारतातील वातावरण या पक्ष्याच्या आरोग्यासाठी अनुकूल असल्याचा दावा पालिकेनं केलाय. साधारणत: पेंग्विनचे आयुर्मान अंदाजे ३० वर्षांचे असून ते वर्षातून दोनदा अंडी देतात व सुमारे ४० दिवसांत पिलांना जन्म देतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.