www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
यंदा दिवाळी नोव्हेंबर महिन्यात असली तरी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र ऑक्टोबर महिन्यातच सुरू होणार आहे. कारण, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणारा पगार या सणासुदीच्या महिन्यात मात्र एक आठवडा अगोदर म्हणजेच २४ ऑक्टोबरलाच होणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात आनंद पसरलाय कारण आता त्यांना आपली दिवाळीची खरेदी याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही करता येणार आहे. सणासुदीचे दिवस विचारात घेऊन राज्याच्या अर्थ खात्यानं ऑक्टोबर महिन्याचे वेतन तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन याच महिन्यात देण्याचा आदेश अधिदान व लेखा कार्यालय, तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालयांना दिलेत. त्यांनी या वेळापत्रकाप्रमाणे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन देण्याबाबत कार्यवाही करावी, असंही या परिपत्रकात म्हटलंय.
अर्थ खात्याचा हाच निर्णय राज्यातील जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठ, अशासकीय महाविद्यालये, मान्यताप्राप्त आणि अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही लागू होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.