पालिकेची बिल्डरवर मेहेरबानी, रहिवाशांचं घर उन्हात!

बीएमसीच्या जमिनीवर संक्रमण शिबीराच्या तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या इमारती पक्क्या स्वरूपात दाखवून त्याबदल्यात बिल्डरनं एसआरएकडून कोट्यवधींचा टीडीआर मिळवला. बीएमसी आणि एसआरएमधील अधिकाऱ्यांच्या संगनमतातून लोअर परेलच्या गोमातानगरमधील संक्रमण शिबिराचा घोटाळा आकारास आला आहे.

Updated: Jun 17, 2016, 04:40 PM IST
पालिकेची बिल्डरवर मेहेरबानी, रहिवाशांचं घर उन्हात!   title=

कृष्णात पाटील, मुंबई : बीएमसीच्या जमिनीवर संक्रमण शिबीराच्या तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या इमारती पक्क्या स्वरूपात दाखवून त्याबदल्यात बिल्डरनं एसआरएकडून कोट्यवधींचा टीडीआर मिळवला. बीएमसी आणि एसआरएमधील अधिकाऱ्यांच्या संगनमतातून लोअर परेलच्या गोमातानगरमधील संक्रमण शिबिराचा घोटाळा आकारास आला आहे.

प्रशासन मेहेरबान तो... 

प्रभादेवी इथं सुधाकर शेट्टी या बिल्डरचा मोठा एसआरए प्रोजेक्ट सुरू आहे. तिथल्या मूळ रहिवाशांना त्यांची कायमस्वरूपी घरे बांधून देईपर्यंत शेट्टी यांच्या स्कायलर्क बिल्ड कंपनीने लोअर परेल इथल्या गोमातानगर इथं बीएमसीच्या जमिनीवर दहा इमारती बांधून संक्रमण शिबीर उभे केले. 

२००६ मध्ये बांधलेल्या या इमारती तात्पुरत्या स्वरूपात स्टील स्ट्रक्चरमध्ये बांधल्या गेल्या. छतावर एसी सीट, भिंतीच्या जागी जिप्सम बोर्ड... असे मटेरियल वापरून तात्पुरत्या स्वरूपात इमारती उभ्या केल्या. परंतु बिल्डरनं बीएमसी आणि एसआरए अधिकाऱ्यांना हाताशी धरून कागदोपत्री या इमारती पक्क्या आणि कायमस्वरूपी दाखवल्या. इतकंच नव्हे तर बीएमसीच्या महाभागांनी हे संक्रमण शिबीर ताब्यातही घेतले. याबदल्यात लगेच एसआरए बिल्डरला दोन लाख चौरस फूटाचा टीडीआर देवून मोकळीही झाली. तसंच बिल्डरने संक्रमण शिबिराच्या भाड्यापोटी बीएमसीची अकरा कोटी रूपयांहून अधिकची रक्कम थकवली आहे ती वेगळीच. म्हणजे बीएमसी आणि एसआरए बिल्डरवर कशी मेहेरबान होते. त्याचे हे उदाहरण... 

इमारती ठरल्या धोकादायक 

आता या संक्रमण शिबिरातील इमारती बीएमसीनं राहण्यासाठी धोकादायक ठरवल्यानं रहिवाशांना बाहेर काढलं जातंय. त्याला रहिवाशांचा विरोध आहे. त्यामुळं आता रहिवाशांची सहानुभूती मिळवण्यासाठी राजकीय पक्ष पुढं येत आहेत. मनसेने तर बिल्डरनं बीएमसीला ४०० कोटींना फसवले असून आयुक्त बिल्डरला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. 

जमीन बीएमसीची, राहणारे लोक बिल्डरच्या प्रोजेक्टमधले, टीडीआर बिल्डरला...आणि बीएमसीला काय? हाती धतुरा... बिल्डर सुधाकर शेट्टी यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार देत आपली बाजू लेखी देवू, असंही सांगितलं. पण दिले नाही.

या प्रकरणात घोटाळा झाल्याचे दिसून येत असलं तरी अद्यापही चौकशीची भाषा ना बीएमसीकडून येतंय ना सरकारकडून...