मुंबई : राज्यात स्वाईन फ्लूचं अक्षरशः तांडव सुरू आहे... आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळं 75 जण दगावले असून, गेल्या 24 तासात 27 जणांचा बळी स्वाइन फ्लूनं घेतलाय. तर राज्यात 530 हून अधिक जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं उघड झालंय. त्यातील 18 रुग्ण अद्यापही व्हेन्टिलेटरवर आहेत.
नागपूरमध्ये सर्वाधिक 29 जणांचा स्वाईन फ्लूमुळं मृत्यू झाला असून, गेल्या 24 तासांत दोन जण दगावलेत. त्याशिवाय पिंपरीमध्येही एकाचा स्वाईन फ्लूमुळं मृत्यू झालाय. आतापर्यंत 530 हून अधिक जणांना या रोगाची लागण झालीय. अमरावतीमध्ये फेब्रुवारीमध्ये स्वाईन फ्ल्यूमुळे 4 जणांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सध्या 124 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
खोट्या औषधांपासून सावधान...
प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून शहरातले सर्व कचऱ्यांचे ढीग, गटारे, नाले स्वच्छ करण्याच्या तसंच डम्पिंग ग्राऊंडवर फवारणी करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रवीण पोटेंनी दिल्यायत. तर स्वाईन फ्ल्यूची औषधे शासकीय रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे खोट्या जाहिराती करुन विकली जाणारी औषधं जनतेनं घेऊ नयेत असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.
कसा रोखणार स्वाईन फ्लू?
स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारची आरोग्य यंत्रणाही कामाला लागलीय. स्वाईन फ्लू संबंधित टेस्ट करण्यासाठी लॅबचे दर 4 ते 5 हजारांवरून 2 ते अडीच हजार रूपये असे कमी करण्याच्या सूचना लॅबना देण्यात आल्यात.
त्याशिवाय स्वाईन फ्लूची गोळी आणि मास्कची महागड्या दरानं विक्री करणाऱ्यांचा औषध परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिलाय. खासगी हॉस्पिटलनीही स्वाईन फ्लूचे रुग्ण दाखल करून घ्यावेत तसंच 50 पेक्षा जास्त बेड संख्या असणाऱ्या हॉस्पिटलनी किमान दोन टक्के बेड आयसोलेशनसाठी खास राखून ठेवावेत, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्यात.
संपूर्ण देशातच स्वाईन फ्लूचं थैमान
स्वाईन फ्लूनं महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात थैमान घातलंय. कोणत्या राज्यात किती जणांचा बळी गेलाय त्यावर एक नजर...
देशभरात स्वाईन फ्लूचे 3 दिवसांत 100 बळी, आतापर्यंत 600 हून अधिक बळी
दिल्लीत नव्याने 75 जणांना स्वाईन फ्लूची लागण झालीय
पंजाबमध्ये 21 जणांचा मृत्यू झालाय.
हैदराबादेत स्वाईन फ्लूने 5 जणांचा बळी गेलाय.
राजस्थानमध्ये स्वाईन फ्लूमुळे 176 जण दगावले
गुजरातमध्ये स्वाईन फ्लूचे 150 जणांचा बळी
मध्य प्रदेशमध्ये स्वाईन फ्लूने 76 जणांचा मृत्यू
स्वाईन फ्लूमुळे महाराष्ट्रात 75 जणांचा बळी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.