www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्रातून नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन गेलेल्या टाटा उद्योग समूहाने पुन्हा महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात टाटा समूह पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. यासाठी संपूर्ण आराखडा तयार करावा लागेल. या कारणाने महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आणि टाटा समूहादरम्यान कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे.
सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि टाटा समूहाचे मानद संचालक रतन टाटा यांच्यात भेट झाली, यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
राज्यात चांगली गुंतवणूक करण्यात आल्याने, राज्यातील पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात चांगली प्रगती करता येऊ शकते.
बैठकीनंतर रतन टाटा म्हणाले,`महाराष्ट्र हे देशातील प्रगती करणारे राज्य आहे. या कारणानेच राज्याची प्रगतीकडे वाटचाल कायम ठेवण्यासाठी आणि विकासाच्या कामात इतर राज्यांना दिशा दाखवण्यासाठीच टाटा समूहाने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने राज्याच्या विकासासाठी आम्ही काम करणार आहोत.`
या बैठकीमध्ये राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिआ, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, शिक्षण विभागाच्या सचिव अश्र्विनी भिडे, रोजगार स्वयंरोजगार आयुक्त विजय गौतम आणि राज्यातील इतर महत्वाचे शासकीय व्यक्ती उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.