मराठी अभिनेत्याच्या आई-वडिलांना लूटण्याचा प्रयत्न

दादर टर्मिनसवर उतरलेल्या वृद्ध प्रवाशांना हेरून त्यांना लुटण्याची एक मोडस ऑपरेंडी काही टँक्सीवाल्यांनी सुरू केली आहे. याचा अनुभव आला खुद्द मराठी अभिनेता प्रदीप कबरे यांच्या वृद्ध आई वडिलांना.

Updated: Aug 21, 2016, 02:06 PM IST
मराठी अभिनेत्याच्या आई-वडिलांना लूटण्याचा प्रयत्न title=

मुंबई : दादर टर्मिनसवर उतरलेल्या वृद्ध प्रवाशांना हेरून त्यांना लुटण्याची एक मोडस ऑपरेंडी काही टँक्सीवाल्यांनी सुरू केली आहे. याचा अनुभव आला खुद्द मराठी अभिनेता प्रदीप कबरे यांच्या वृद्ध आई वडिलांना.

मराठी अभिनेता प्रदीप कबरे यांचे हे वृद्ध आई-वडील. दोघंही हार्ट पेशंट.. मात्र शनिवारी त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग ते आयुष्यात कधीच विसरु शकणार नाहीत. राज्यराणी एक्स्प्रेसनं दादर स्टेशनवर उतरल्यावर कांदिवलीला आपल्या मुलाच्या घरी जाण्यासाठी त्यांना टॅक्सी शोधाशोध करावी लागली नाही. कारण प्लॅटफॉर्मवरच एका टॅक्सी एजंटनं त्यांना गाठून टॅक्सीत बसवलं. टॅक्सी सुरु होण्याआधी ड्रायव्हरच्या शेजारी आणखी एक व्यक्ती येऊन बसली. यानंतर वृद्ध कबरे दाम्पत्याला आलेला अनुभव अंगावर शहारे आणणाराच असा होता.  

आर्थिक फसवणूक तर झालीच शिवाय टॅक्सी वेगानं उलट्या दिशेला जात असल्याचं लक्षात आल्यावर प्रदीप कबरे यांच्या मातोश्रींनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला. अखेर टॅक्सीवाल्याने गाडी थांबवत दोघांनाही खाली उतरवून तिथून पोबारा केला. यावेळी या वृद्ध दाम्पत्याचा मदतीला धावले ते मदिना हॉटेलचे मालक अब्दुल लतीफ. 

दादर पूर्वेला काही टॅक्सीवाल्यांची अशाचप्रकारची मोडस ऑपरेंडी आहे. जादा पैसे घेवूनही हातचलाखीद्वारे कमी पैसे घेतल्याचे भासवत अशा भामट्यांनी अनेकांना गंडा घातलाय. आता तर त्यांची मजल वृद्ध दाम्पत्यांना हेरून त्यांना लुटण्यापर्यंत गेली आहे.