शिवसेना-भाजपमधील मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच तीव्र

महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्याआधीच शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेली स्पर्धा आता तीव्र झालीय. मुख्यमंत्री पदावर दावा ठोकताना हे पद आपल्याकडेच असावं यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होताहेत.

Updated: Aug 2, 2014, 08:22 PM IST
शिवसेना-भाजपमधील मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच तीव्र   title=

मुंबई: (दिनेश दुखंडे, प्रतिनिधी) महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्याआधीच शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेली स्पर्धा आता तीव्र झालीय. मुख्यमंत्री पदावर दावा ठोकताना हे पद आपल्याकडेच असावं यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होताहेत.

लोकसभा निवडणूक एकत्र लढलेल्या शिवसेना-भाजपने महाराष्ट्रात नेत्रदीपक यश मिळवलं, मात्र विधानसभा निवडणूकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये सारं काही आलबेलं आहे अशी स्थिती नाही. निवडणूकीआधीच दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप आणि मुख्यमंत्री पदावरुन अंतर्गत ठिगणी पडलीय. शिवसेनेनं याआधीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलंय. युतीत मित्र असलेल्या भाजपला अचानक बसलेला हा धक्का आहे, तर महायुतीतील अन्य घटक पक्षांची या घोषणेवर अद्याप सहमती बनलेली नाही. शिवसेनेचे नेते मात्र दिवसागणिक आपली भूमिका आणि दावा आणखी मजबूत करताहेत...

लोकसभा निवडणूकीत महायुतीनं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला आस्मान दाखवलं. राज्यात महायुतीचे एकूण 42 तर एकट्या शिवसेनेचे 18 खासदार निवड़ून आले, त्यामुळे सहाजिकच उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास वाढलाय. नेत्यांकरवी आपल्या मुख्यमंत्री पदाची मागणी पुढे करुन उद्धव यांनी राजकीय खेळी केलीय. त्यामुळं प्रदेश भाजप अस्वस्थ आहे. चर्चेनंच सर्व निर्णय होतील अशी प्रदेश भाजप नेत्यांची भूमिका आहे.

राज्यात महायुतीच्या सत्तेची चाहुल लागताच शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहे, तर भाजपमध्येही मुख्यमंत्री पदाचे दावेदार निर्माण झालेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांची नावं प्रामुख्यानं चर्चेत आहेत. मुख्यमंत्री पदावरुन युतीत ठिणगी पडण्याचं तेही एक कारण मानलं जातंय. शिवसेना भाजपच्या रस्सीखेचीत महायुतीतील घटक पक्ष संभ्रमात आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरुन आघाडीत वाद निर्माण झाले असताना, महायुतीतही आलबेल नाही. नेते मात्र महायुतीत सारं काही व्यवस्थित असल्याचं दाखवण्याचा कसोशीनं प्रयत्न करताहेत. मात्र जागावाटप- मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्येही मतभेद आहेत. प्राथमिक स्तरावर असलेल्या या मतभेदांनी टोक गाठलं तोंडाशी आलेला सत्तास्थापनेचा घास थोडक्यात मुकावा लागू शकतो याची महायुतीच्या नेत्यांना पूर्ण कल्पना आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.