नालासोपारा : माणुसकीला काळीमा फासणारी घटना नालासोपा-यात घडलीये. दोन अल्पवयीन मुलांना भर चौकात अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीये.
नालासोपा-यातील धानीव बाग परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय. मोहित वय 13 वर्ष आणि गोलू पांडे वय 16 वर्ष अशी या मुलांची नावं आहेत. नवरात्रोत्सवात देवीच्या समोरील दानपेटीतील पैसे चोरल्याच्या आरोपावरुन दोन अल्पवयीन मुलांना या भागातील तीन बिल्डरांनी अमानुष मारहाण केलीये.
ही घटना 7 ऑक्टोबर रोजी घडली.
ज्या मुलांना मारहाण केली त्यांच्या एका मित्रानं या घटनेचं मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्यानं हा धक्कादाक प्रकार उघडकीस आलाय. दीपक सिंग, आरजू श्रीवास्तव आणि मुकेश यादव या तिघांनी चोरीच्या आरोपावरुन या मुलांना मारहाण केलीये.
सुरुवातीला या दोघांना बंद खोलीत बेदम मारण्यात आलं त्यानंतर भर चौकात या दोघांना तब्बल 15 मिनिटं पट्ट्यानं फोडून काढलं. शिवाय या दोघांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या मारहाणीमुळे ही दोन मुलं इतकी भेदरली की दोघे आठवडाभर घरी गेलेली नाहीयेत. अजूनही हि दोन मुलं दहशतीखाली वावरत असून त्यांना मारहाण करणारे बिल्डर मात्र मोकाट फिरत आहेत.