www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे दोन मोठे प्रकल्प आज मुंबईकरांसाठी खुले झाले आहेत. खेरवाडी फ्लायओव्हरच्या दक्षिण दिशेकडील मार्गिकेचं उदघाटन झालंय. या फ्लायओव्हरमुळे बोरिवली ते वांद्रे हा प्रवास आणखी फास्ट होणार आहे. तर कोणत्याही अडथळ्याशिवाय दक्षिण मुंबईतून थेट घाटकोपरपर्यंत जाणारा ईस्टर्न फ्रीवेचा दुसरा टप्पा पांजरपोळ ते घाटकोपर या टप्प्याचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
बोरीवली ते वांद्रे फ्लायओव्हर
मुंबईतल्या खेरवाडी फ्लायओव्हरच्या दक्षिण दिशेकडील मार्गिकेचं उदघाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पश्चिम द्रुतगती मार्गावर खेरवाडी जंक्शनजवळ सतत वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे तिथे उड्डाणपूल सुरु झाल्यानं अनेक प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
या नव्या फ्लायओव्हरमुळे बोरिवली ते वांद्रे हा प्रवास आणखी फास्ट होणार आहे. या उड्डाणपुलाची मार्गिका खुली झाल्यानंतर दहिसर ते वरळी या टप्प्यात वाहनाला एकही सिग्नल लागणार नाही. दरम्यान या मार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेना आमदार बाळा सावंत यांनी केलीय.
पांजरपोळ ते घाटकोपर - ईस्टर्न फ्री वे
तर कोणत्याही अडथळ्याशिवाय दक्षिण मुंबईतून थेट घाटकोपरपर्यंत जाणारा ईस्टर्न फ्रीवेचा दुसरा टप्पा पांजरपोळ ते घाटकोपर या टप्प्याचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
गेल्या वर्षी इस्टर्न फ्री वे चेंबूरपर्यंत खुला करण्यात आला होता. त्यानंतर 2.80 किलोमीटर लांबीच्या पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्त्याचेही काम पूर्ण झाले. यामुळे मुंबई घाटकोपरपर्यंतचा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.