राणे भाजपमध्ये जाणार या प्रश्नावर उद्धव म्हणाले...

 काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार या शक्यतेची  बातमी अनेक दिवसापासून चर्चिली जात आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 25, 2017, 06:26 PM IST
 राणे भाजपमध्ये जाणार या प्रश्नावर उद्धव म्हणाले...  title=

मुंबई :  काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार या शक्यतेची  बातमी अनेक दिवसापासून चर्चिली जात आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

नारायण राणे भाजप प्रवेशाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता हात जोडून उद्धव म्हणाले,  त्या दोघांनाही शुभेच्छा!!!!

या विषयावर सूचक प्रतिक्रिया देऊन अनेक तर्क वितर्कांना पुन्हा जागा करून दिली आहे.  राणे भाजपमध्ये गेले तर त्यांचे काय होणार यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भाजपने राणेंना पक्षात घेतल्यावर पक्षाची स्थिती काय होईल याबदलही उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

यापूर्वी असे महापालिका निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी युती करणार काय या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी काहीच प्रतिक्रिया न देता फक्त पत्रकारांना जय महाराष्ट्र म्हटले होते. 

राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला,  त्यानंतर ते पत्रकारांशी विविध विषयांवर बोलले. 

 

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही 

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे पण शिवसेना त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे आहे. 
हे इतकं ताणले जाण्याची गरज नव्हती. शेतकरी रस्त्यावर उतरले तेव्हाच पटकन दखल सरकारने घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज लागणार नाही असा कारभार केला पाहिजे. मला तशी अपेक्षा आहे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले. 

शेतकरी परिस्थितीचा शिकार बनत आलेला आहे. शिवसेनेची मागणी आहे शेतकऱ्यांना एकदा  तरी पूर्णपणे कर्जमुक्त केलं पाहिजे, असे मत ठाकरे यांनी आज व्यक्त केले. 

मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी आमच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला, आणि निर्णय घ्यायला भाग पाडले. हा पवित्रा शेतकऱ्यांसाठी घेतला. मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभारही उद्धव ठाकरे यांनी मानले. 

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी मदत द्या: मुख्यमंत्री अशी बातमी वाचली. एखादा जिल्हा आत्महत्याग्रस्त होईपर्यंत वाट न पाहता शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नये, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. 

शिवसेनेचा भागवत यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा 

मोहन भागवत यांचं नाव मनापासून राष्ट्रपती पदासाठी सुचवलं आहे.
शरद पवारांच्या बाबतीत म्हणायचं तर ते मोदींचे गुरू आहेत,असं मोदींनी सांगितलं.
त्यांना पद्मविभूषण दिले. मला माहित नाही कुणाच्या मनात काय येईल ?
एकमेकांची मन जाणून घ्यायला तेवढी जवळीक लागते. अनेक वर्षांनी पहिल्यांदा एकहाती सत्ता आली आहे. जर कणखर आणि खंबीर राष्ट्रपती असतील तर का नको ? असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी भागवतांच्या नावाला पुन्हा एकदा पाठिंबा दिला आहे. 

 हिंदुराष्ट्र संकल्पनेसाठी भागवत हेच लायक असतील का ? असा पत्रकारांनी विचारले असता उद्धव म्हणाले,  का नसावेत ? इतर राज्यात राज्यपाल आणि अनेक पदांवर इतरत्र  rss कार्यकर्त्यांची नेमणूक झालीय. मग देशाचं नेतृत्व त्यांनी करायला हरकत नाही ! असेही आपल्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले आहे. 

नक्षलवादी हल्ला
 

काश्मीर शांत होत नाही छत्तीसगढ मध्ये हल्ला झाला. तुम्हाला वाटेल मी कुत्सुतेने बोलतोय, गोवंश हत्याबंदी कायदा काही राज्यात झाला. काही राज्यात होत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम होत नाही असं बोललं जातं.
मग काश्मीर ,छत्तीसगढमध्ये नोटबंदी झाली नसेल कदाचित ! असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

पेट्रोल दरवाढ 

इतर राज्यात आपल्या सोयीने दर लावतात. त्यामुळे दरवाढ होते. समान कर असेल तर दर पण समान असले पाहिजे. मुंबईत सगळ्यात जास्त दराने पेट्रोल विकल जात असेल तर ते चूक आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

जागतिक बाजारपेठेत पेट्रोल, डिझेल भाव खाली आले. तरी आपल्या देशात दर खाली आले नाही. माझी अपेक्षा आहे जर समान कर लावणार असू तर देशभरात दर पण समान असायला हवेत.