कामगार नेते शरद राव यांचं निधन

कामगार नेते शरद राव यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. शरद राव यांच्या राहत्या घरी आज त्यांचं निधन झालं. शरद राव यांनी अनेक कामगार संघटनांचं नेतृत्व केलं होतं. शरद राव हे रिक्षा-टॅक्सी युनियनमध्ये जास्त लोकप्रिय होते. रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीसंदर्भात त्यांची भूमिका महत्वाची ठरत असे.

Updated: Sep 1, 2016, 05:00 PM IST
कामगार नेते शरद राव यांचं निधन

मुंबई : कामगार नेते शरद राव यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. शरद राव यांच्या राहत्या घरी आज त्यांचं निधन झालं. शरद राव यांनी अनेक कामगार संघटनांचं नेतृत्व केलं होतं. शरद राव हे रिक्षा-टॅक्सी युनियनमध्ये जास्त लोकप्रिय होते. रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीसंदर्भात त्यांची भूमिका महत्वाची ठरत असे.

शरद राव यांच्या प्रभावाखाली मुंबईतील कामगार मोठ्या प्रमाणात होते, रिक्षा, फेरीवाले, किरकोळ व्यापारी, कारागीर, छोटे व्यापारी, शेतमजूर, महापालिका, नगरपालिका कर्मचारी त्यांच्या एका शब्दावर आजही संप आणि आंदोलने करण्यास तयार होत होते. 

शरद राव यांची कारकीर्द हिंद किसान मजदूर सभेबरोबरच सुरू झाली.  शरद राव यांनी 'बंद सम्राट' जॉर्ज फर्नाडिस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले. जनता दलाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणूनही ते कार्यरत होते. 

जॉर्ज फर्नाडिस खासदार म्हणून दिल्लीला गेल्यानंतर राव यांनी कामगार संघटनेची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आणि ते मुंबईतील कामगारांचे अनभिषिक्त नेते झाले. पण त्यांना जॉर्ज यांची बरोबरी कधीच करता आली नाही. 

शरद राव यांनी १९९० साली गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत राव यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राजकीय स्थित्यंतरात जनता दलाला उतरती कळा लागली. 

शरद पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडली. त्यानंतर, शरद राव पवारांसोबत गेले. सोयीस्करपणे कधी कामगार नेते तर कधी राजकारणी म्हणून वावरण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेही गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढवली. पण त्यांच्या पदरी निराशा आली. अखेर, पुन्हा त्यांनी आपला मोर्चा कामगार संघटनेकडे वळवला.