www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य सरकार पुरस्कृत स्वस्त भाज्या केंद्राचं उद्धघाटन आज मुंबईत होणार होतं मात्र, या उद्धघाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांची वेळच मिळाली नाही. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय.
आजपासून शहरातल्या १०० पेक्षा अधिक केंद्रावर स्वस्त दरात भाजी उपलब्ध करुन देण्याची घोषणा सरकारनं केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे मुंबईकरांना स्वस्त भाज्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेल तेव्हाच स्वस्त भाज्या मिळणार का? असा संतप्त सवाल मुंबईकर विचारतायत.
किरकोळ भाजी विक्रेत्यांनी भाज्यांचे अव्वाच्या सव्वा दर वाढवल्यानंतर राज्य सरकारने यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबईतल्या निवडक १०० भाजी विक्री केंद्रावर राज्य सरकारकडून स्वस्त दरात भाजी विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी अपना बाजार सारख्या सहकारी संस्थांची मदत घेतली जातेय. आता ही केंद्र नेमकी कधी सुरु होणार? हे केवळ मुख्यमंत्रीच सांगू शकतील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.