कुणी लिहिली संजय दत्तच्या सुट्टीची 'स्क्रिप्ट'?

फर्लो रजा संपल्यानं गुरूवारी संजय दत्तनं पुन्हा येरवडा तुरूंगात परतणं अपेक्षित होतं. मात्र, मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील हा दोषी अभिनेता अजूनही मुंबईतल्या आलिशान घरात मोकळा श्वास घेतोय. कुणाच्या 'मेहेरबानी'वर हा मुन्नाभाई एवढी ऐष करतोय?

Updated: Jan 10, 2015, 10:11 AM IST
कुणी लिहिली संजय दत्तच्या सुट्टीची 'स्क्रिप्ट'? title=

मुंबई : फर्लो रजा संपल्यानं गुरूवारी संजय दत्तनं पुन्हा येरवडा तुरूंगात परतणं अपेक्षित होतं. मात्र, मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील हा दोषी अभिनेता अजूनही मुंबईतल्या आलिशान घरात मोकळा श्वास घेतोय. कुणाच्या 'मेहेरबानी'वर हा मुन्नाभाई एवढी ऐष करतोय?

कायद्यापुढं सगळे समान असतात, हा आता घिसापिटा फिल्मी डायलॉग झालाय... कारण तुम्ही संजय दत्त असाल तर जेल प्रशासन, पोलीस आणि राज्य सरकारदेखील तुमच्यासाठी पायघड्या घालायला तयार असतं... अगदी मुंबई बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी तुम्हाला शिक्षा झाली असली तरीही... सध्या येरवडा जेलमध्ये तुरूंगवास भोगत असलेल्या संजूबाबाची १४ दिवसांची फर्लोची रजा गुरूवारी संपली. तुरुंगात परतण्यासाठी त्यानं पुणंही गाठलं. मात्र ऐनवेळी या खलनायकाच्या मदतीला राम धावून आला... संजय दत्तची फर्लो रजा १४ दिवसांनी वाढवण्याच्या अर्जावर विचार सुरू असल्याचं वक्तव्य गृह राज्यमंत्री राम शिंदेंनी केलं आणि लाडक्या संजूबाबाला पळवाट सापडली.

जेलमध्ये जाण्याऐवजी संजय दत्त पुन्हा मुंबईला परतला. त्याचं जेलबाहेर राहणं बेकायदेशीर असल्याची टीका कायदेतज्ज्ञांकडून होतेय. सरकार संजय दत्तची पाठराखण करत असल्याचा आरोपही गृह राज्यमंत्री राम शिंदे यांच्यावर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर यांनी केलाय. 

संजय दत्तच्या रजा वाढीबाबत झी मीडियानं थेट गृह राज्यमंत्र्यांना सवाल केला, तेव्हा ते अक्षरशः निरूत्तर झाले.

संजय दत्तच्या फर्लोवरून जेल प्रशासन, पोलीस आणि सरकारनं गेल्या दहा दिवसांपासून गोंधळात गोंधळ घातला... अखेर शुक्रवारी त्याच्या फर्लोला १४ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. संजय दत्तला जेलबाहेर मोकाट फिरता यावं, यासाठीच ही स्क्रिप्ट जाणीवपूर्वक लिहिली नव्हती ना...?
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.