मुंबई : ख्यातनाम नाटककार, लेखक व रंगकर्मी अशोक पाटोळे यांचे आज पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मृत्यूपूर्वी अशोक पाटोळे यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. आपल्या देहावर रुढी आणि प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार न करता मृत्यूनंतर आपला देहदान करण्यात यावा, अशी त्यांची इच्छा असल्याचं त्यांचा मुलगा रुपेश पाटोळे यानं स्पष्ट केलंय. देहदानासाठी त्यांचं पार्थिव जसलोक हॉस्पीटलमधून केईएम हॉस्पीटलमध्ये हलवण्यात येईल.
कथाकार, नाटककार म्हणून साहित्यविश्वात प्रसिद्ध असलेले अशोक पाटोळे यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. १९७१ मध्ये त्यांनी 'आयजीच्या जिवावर बायजी उदार' ही पहिली एकांकिका लिहिली. त्यानंतर झोपा आता गुपचूप , प्रा. वाल्मिकी रामायण, हीच तर प्रेमाची गंमत आहे यांसारख्या विनोदी नाटकांपासून ते 'आई रिटायर होतेय', 'आई रिटायर होतेय' आणि 'मी माझ्या मुलांचा' यांसारख्या नाटकांचे लेखन केले.
या व्यतिरिक्त 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' हा कथासंग्रह, पाटोळ्यांच्या पाचोळ्या हा कवितासंग्रह आणि अधांतर, हद्दपार, अध्यात न मध्यात, हसरतें यांसारख्या यशस्वी दूरदर्शन मालिकांचे लेखनही त्यांनी केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.