अण्णांच्या संघटनांमध्ये मतभेद

भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊन देशात परिवर्तन घडवण्यासाठी अण्णा हजारे यांनी मोठं जनआंदोलन उभं केलं. मात्र या आंदोलनात देशात परिवर्तन होण्याआधी आंदोलनाच्या मंचावर परिवर्तन झालेलं दिसलं.

Updated: Jun 6, 2012, 10:12 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊन देशात परिवर्तन घडवण्यासाठी अण्णा हजारे यांनी मोठं जनआंदोलन उभं केलं. मात्र या आंदोलनात देशात परिवर्तन होण्याआधी आंदोलनाच्या मंचावर परिवर्तन झालेलं दिसलं. अण्णांच्या बीव्हीजे आणि आयएसी या दोन्ही संघटनांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलाय. निमित्त होतं अण्णांच्या मुंबईतल्या आंदोलनाचं....

 

गेली दीड वर्ष अण्णांच्या मुंबईतील आंदोलनाची जबाबदारी ‘इंडिया अगेंस्ट करप्शन’ ही संघटना घेत होती. मात्र मंगळवारी मुंबईत झालेलं आंदोलन हे अण्णा हजारे यांच्या जुन्या भ्रष्टाचार विरूद्ध जनआंदोलन समितीनं पार पाडलं. संपूर्ण दिवसभर एरवी मंचावर पुढे-पुढे करणारा आयएसीचा एकही कार्यकर्ता दिसला नाही. नेहमी मंचावर असणारे आयएसीचे मुंबईतील मुख्य समन्वयक मयांक गांधी हेसुद्धा सुरूवातीला लोकांमध्ये जाऊन बसले होते. आयएसीच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यावर मयांक गांधी मंचावर गेले. मात्र या घटनेनंतर या दोन संघटनांमधील वाद समोर आलेत. मयांक गांधींनी मैदानात खाली बसून आपली नाराजी दाखवून दिलीय.

 

1993 साली अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी जनआंदोलन समितीची सुरूवात केली. मात्र गेल्या काही दिवसांत अण्णा दिल्लीला पोहचल्यानंतर आयएसीनं अण्णांच्या आंदोलनाचा ताबा घेतला. त्यामुळे दोन्ही संघटनांमध्ये शीतयुद्ध सुरू झालयं.

 

अण्णांच्या आंदोलनाचा ताबा बीव्हीजेनं घेणं, आयएसीचा एकही व्यक्ती सक्रीय नसणं या गोष्टी दोन्ही संघटनांमधील वादाची काळी बाजू समोर आणतात. अण्णांनीही याबाबत आजपर्यंत भूमिका स्पष्ट केलेल नाही. मात्र अशी वादाची एक ठिणगी देखील या जन आंदोलनासाठी घातक ठरू शकते.