www.24taas.com, दिनेश मौर्या, मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या पेपरफुटीत कुंपणानेच शेत खाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेपर फोडण्यात दोन प्राध्यापक, पाच शिपाई, दोन लॅब असिस्टंट आणि पाच विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. विद्यापीठाने प्रेमचंद कांबळे याला तातडीने निलंबित केलं. तर भरत भगत सिंह, परेश तेंडूलकर आणि विकास उज्जीनवाल या तीन हंगामी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली.
मुंबई विद्यापीठ पेपरफुटीला जबाबदार असणारे. गणेश जाधव, परेश तेंडुलकर, विकास उनवला, प्रेमचंद कांबळे, भारत भजनसिंग, विवेक गायकवाड, सचिन लाड, मिलींद लाड, शादाब राऊत, अनिरुद्द मुसबे, श्रीकांत मोरे, गौरव तळेकर, किरण लब्धे, सुनील मोहीते यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला. कर्जतमध्ये दोन शिक्षक आणि लॅब कर्मचारी पेपर लीक करत होते. तर मुंबई विद्यापीठात काम करणारे शिपाई आपल्या साथीदारांच्या मदतीनं पेपर फोडण्यासाठी मदत करत होते. बीईई, फिजिक्स टू आणि मॅथ्स टू हे तीन पेपर विकून या आरोपींनी लाखो रुपयांची कमाई केली.
प्रश्नपत्रिका तयार झाल्यानंतर आरोपी त्या प्रश्नपत्रिकेची फोटोकॉपी काढायचे. ती कॉपी विद्यार्थ्यांना वाट्टेल त्या किमतीला विकली जायची. पेपरफुटीनंतर एका विद्यार्थ्यानं फेसबूकवर प्रश्न पत्रिका पोस्ट केली. इथूनच पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पहिला धागा मिळाला. एकूण १४ आरोपींना पोलिसांनी या प्रकरणात अटक केली असून, त्यामध्ये ५ विद्यार्थी, ५ शिपाई, दोन प्राध्यापक आणि दोन लॅब असिस्टंट यांचा समावेश आहे.
याप्रकरणी प्रेमचंद कांबळे याला तातडीनं निलंबित करण्यात आलं. फेरपरीक्षेबाबत ८ जूनला निर्णय होणार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना ८ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.