www.24taas.com, मुंबई
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर अँन्जिओप्लास्टी झाल्यानंतर सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. लिलावती रुग्णालयात शुक्रवारी उद्धव यांच्यावर अँन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज मिळेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण आता सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उद्धव ठाकरे यांची लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांनी उद्धव यांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच अमिताभ बच्चन यांनीही उद्धव यांची लीलावतीमध्ये जाऊन भेट घेतली.
अँजिओप्लास्टीसाठी उद्धव यांना शुक्रवारी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे २ तास प्राथमिक चाचण्या केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. उद्धव यांच्या शस्त्रक्रियेवेळी त्यांचे बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील लिलावतीत उपस्थित होते. त्यांच्यासोबत मनसेचे आमदार बाळा नांदगावकर आणि त्यांची आई देखील उपस्थित होती. उद्धव यांच्या आरोग्यासाठी राज्यभरात शिवसैनिकांनी प्रार्थना सुरू केली होती. नागपूरमध्ये टेकडी गणपती मंदिरात पूजा करण्यात आली. तर औरंगाबादमध्येही महाआरती करण्यात आली.