काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीला राणे अनुपस्थित

काँग्रेसचे राज्यप्रभारी मोहन प्रकाश यांनी बोलावलेल्या राज्यातल्या काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीला उद्योग मंत्री नारायण राणे गैरहजर राहिल्याने ते मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत काय अशी चर्चा सुरु झालीय.

Updated: May 11, 2012, 12:02 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

काँग्रेसचे राज्यप्रभारी मोहन प्रकाश यांनी बोलावलेल्या राज्यातल्या काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीला उद्योग मंत्री नारायण राणे गैरहजर राहिल्याने ते मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत काय अशी चर्चा सुरु झालीय. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी राबवलेल्या कल्याणकारी योजनांबाबत सरकार आणि पक्षात समन्वय रहावा यासाठी काँग्रेस कमिटीनं अशा बैठकांच आयोजन केलंय.

 

मुंबईत अशा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. याबैठकीला मोहन प्रकाश यांच्या बरोबरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि काँग्रेसचे मंत्री हजर होते. या बैठकीचे निरोप उशीरा देण्यात आले. तरी उद्योगमंत्री नारायण राणे आपल्या पुर्वनियोजित कार्यक्रमाला गेले. महत्त्वाच्या बैठकीला राणे गैरहजर राहिल्याने ते नाराज आहे काय असा प्रश्न निर्माण झालाय.उद्योग धोरण गेल्या सहा महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांकडे पडून आहे त्याबद्दल राणेंची नाराजी असल्याचं समजतंय.

 

विशेष म्हणजे नुकतचं दुष्काळाच्या प्रश्नावर राज्याचं जे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटलं त्यात राणेंचा समावेश नव्हता अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र शिष्टमंडळ दिल्लीत पोहचल्यावर राणेंना निरोप देण्यात आला. योगायोगाने राणे त्यावेळी दिल्लीत असल्यानं ते पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला गेले. मात्र या घटना पाहता राणे मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा झाली. त्यामुळं आपला बोरिवलीतला कार्यक्रम रद्द न करता महत्त्वाच्या बैठकीला राणेंनी दांडी मारल्याचं बोललं जातय..